जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२५ । जळगाव जिल्ह्यात घरफोडी, जबरी जोरी, फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत असून आता अशातच भुसावळ तालुक्यातील दिपनगर परिसरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे वृद्धाला रस्त्यात अडवून पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडील २ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन दोघेजण पसार झाले असून याबाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील खळवाडी परिसरात वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त कर्मचारी वसंत जगन्नाथ पाटील यांची या घटनेत लुबाडणूक झाली आहे. दरम्यान ५ डिसेंबरला वसंत पाटील व त्यांच्यासोबत एकजण असे दोघे दीपनगर बसस्थानक परिसरात गाडीने सोबत जात होते. या दरम्यान दोन अनोळखी इसमांनी त्यांची दुचाकी अडविली. यानंतर त्यांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करत इतके सोने घालून का फिरतात? म्हणून विचारणा केली.
तसेच पोलीस असून तुम्हाला मी सिटी मारली; तरी तुम्ही थांबले का नाहीत. या रस्त्याने एका म्हातारीला लुटलेले असून तुम्ही एवढे सोने घालून चालले आहेत, ते सोने काढा; असे वसंत पाटील यांना सांगू लागले. यानंतर वसंत पाटील यांच्याजवळ असलेले सोने व कागदपत्रे गाडीच्या डिक्कीत ठेवून देण्याचा बहाणा करत दोघांनी हातचलाखीने २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेत दोघांनी पलायन केले. याबाबत दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे करत आहेत.