तरुणावर जीवघेणा हल्ला प्रकरण.. दोघा आरोपींना दोन वर्षे सक्तमजूरी
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । जुन्या जागेच्या वादातून लोखंडी आसारी व लाकडाच्या दांड्याने तरूणाला मारहाण करून डोळा निकामी केल्याची घटना ४ एप्रिल २०१४ रोजी घडली होती. या प्रकरणातील दोघा आरोपींना दोन वर्षे सक्तमजूरी आणि प्रत्येकी १ हजार रूपयांची दंडाची शिक्षा जळगाव जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी १६ सप्टेंबर रोजी दुपारी सुनावली आहे.
शिवराम माळी रा. दापोरा ता.जि. जळगाव हे ४ एप्रिल २०१४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शेतातून घरी येत असतांना त्यांचा मुलगा दिपक शिवराम माळी याला गावातील दिपक प्रकाश वाणी, अनिल उर्फ भाऊसाहेबत प्रकाश वाणी आणि राजाबाई प्रकाश वाणी यांनी घर जागेच्या वादातून शिवीगाळ करून लोखंडी आसारी व लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. या घटनेत दिपकचा एक डोळा निकामी झाला. तसेच शिवराम माळी व त्यांची पत्नी जिजाबाई माळी यांनी देखील मारहाण केली होती. यासंदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील खटला जळगाव जिल्हा न्यायालयातील डी.एन.खडसे यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. यातील आरोपी दिपक प्रकाश वाणी याचा खटल्याचे कामकाज चालू असतांना मयत झाला आहे. यात एकुण ९ साक्षिदार तपासण्यात आले. न्यायालयाने साक्षीपुराव्याच्या आधारे अनिल उर्फ भाऊसाहेबत प्रकाश वाणी आणि राजाबाई प्रकाश वाणी या दोघांना दोषी ठरवत दोन वर्षे सक्त मजूरीची शिक्षा आणि प्रत्येकी १ हजाराचा दंड ठोठावला. दरम्यान शिवराम माळी आणि आरोपींमध्ये तडजोड पुरसिसचा विचार करून आरोपींना शिक्षेच्या ऐवजी दोन वर्षाच्या चांगल्या वर्तणूकीच्या बंधपत्रावर मुक्त करण्यात आले आहे. बंधमुक्ताचे पालन न केल्यास दोघांना न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम राहणार असल्याचा निकाल दिला आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. निलेश चौधरी यांनी कामकाज पाहिले तर पैरवी अधिकारी देविदास काळी यांनी सहकार्य केले.