जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव यांच्या मोहाडी आणि पळसखेडा येथील कृषीदूतांमार्फत पळसखेडा येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी मेळाव्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद लाभला. या कृषी मेळाव्यात कापूस, मका व केळी पिकांवरील समृद्ध शेती या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. बी. एम. गोणशेटवाड (RAWE & AIA कार्यक्रम समन्वयक, कृषी विस्तार शिक्षण विभाग) यांनी केले. या मेळाव्याचे सूत्रसंचालन कृषीदूत रोशन नरोडे आणि सिद्धेश जैन यांनी केले. मेळाव्याचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी मा. श्री. जितेंद्र पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पळसखेडा येथील सरपंच आशाताई संजय पवार होत्या.

यावेळी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे प्रा. पी. एस. देवरे (RAWE & AIA कार्यक्रम अधिकारी, विद्या विभाग), प्रा. बी. एम. गोणशेटवाड (RAWE & AIA कार्यक्रम समन्वयक, कृषी विस्तार शिक्षण विभाग), डॉ. प्रीती दातीर (सहाय्यक प्राध्यापिका, कृषी विस्तार शिक्षण विभाग) उद्यानविद्यातज्ञ प्रा.के.ए.बनसोडे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पळसखेडे येथील माजी सभापती चंद्रशेखर काळे व मोहाडी गाव सरपंच दत्तात्रय पाटील, पळसखेडा उपसरपंच संदीप काळे, भरतसिंग राजपूत (प्रगतशील शेतकरी) यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून तुकाराम निकुले तसेच प्रगतशील शेतकरी अनिल चौधरी साहेब उपस्थित होते. प्रा.शरद पाटील सर जामनेर यांनी कृषीदूतांना महत्त्वाचे मार्गदर्शन दिले .कृषिदूत अमन मोगल, कृषिदूत किरण इंगळे आणि कृषिदूत ऋषिकेश निळे यांनी शेतकऱ्यांना समृद्ध शेती याविषयी मार्गदर्शन केले.
मेळाव्यात शेतकऱ्यांना कापूस, मका व केळी पिकांसाठी सुधारित लागवड तंत्रज्ञान, संतुलित खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच शाश्वत व बाजाराभिमुख शेती पद्धतींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तर सत्रामुळे शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला.
या कृषी मेळाव्याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना समृद्ध शेतीची संकल्पना प्रत्यक्ष शेतावर प्रभावीपणे राबवण्यासाठी सक्षम करणे हा होता. कार्यक्रमातून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे उत्पादनवाढीसह खर्चात बचत साधण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी आयोजक कृषीदूतांचे कौतुक केले. मेळाव्याचा शेवट प्रा. बी. एम.गोणशेटवाड सर (RAWE & AIA कार्यक्रम समन्वयक, कृषी विस्तार शिक्षण विभाग) यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आणि शेतकऱ्यांचे आभार मानून मेळाव्याचा समारोप केला.







