जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ । वर्डी ( ता. चोपडा ) येथील शेतकऱ्यांना नेहमी विद्युत राेहित्रासाठी फिराफिर करावी लागते. या संदर्भात अभियंत्यांना वेळोवेळी विनंती केली असता त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे १९ नोव्हेंबर रोजी वर्डी फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचे निवेदन तहसीलदार, वीज वितरणचे अभियंता व अडावद पोलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक यांना दिले आहे.
सविस्तर असे की, वर्दीसह तालुक्यातील शेतकऱ्यांना नेहमी विद्युत राेहित्रासाठी फिराफिर करावी लागते. या संदर्भात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांना उडवा-उडवीची उत्तरे देतात. दरम्यान, वर्डी, माचला शिवारातील ३ ते ४ कृषी पंपाचे राेेहित्र ६ महिन्यांपासून चोरीला गेले आहेत. या संदर्भात अभियंत्यांना वेळोवेळी विनंती केली असता त्यांनी लक्ष दिले नाही. पावसाळा संपला आता पीक पाण्यावर आली आहेत. तर आता तरी रोहित्र द्या, अशी विनंती शेतकऱ्यांनी अभियंता बाविस्कर यांच्याकडे केली हाेती. त्यांनी शेतकऱ्यांना बिल भरा, असे सांगितले. दरम्यान, या संदर्भात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विनंती केली. तर त्यांनी ही उडवाउडवीची उत्तरे दिली. तर वेळेवर रोहित्र मिळत नाही म्हणून, १९ नोव्हेंबर रोजी वर्डी फाटा येथे रस्ता रोको करण्याचे निवेदन तहसीलदार, वीज वितरणचे अभियंता, अडावद पोलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक यांना दिले आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घ्यावा, असे विजय पाटील तसेच विनायक चव्हाण, डॉ. कांतीलाल पाटील, लहुश धनगर, नंदलाल पाटील, वसंत नायदे, रवींद्र धनगर, कांतीलाल पाटील, शांताराम पाटील, गजानन पाटील, दीपक पाटील, मच्छिंद्र साळुंखे, महेंद्र पाटील, कवीश्वर पाटील व शेतकऱ्यांनी कळवले आहे.