जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । वाकोद येथील श्रीक्षेत्र चौंडेश्वर शिवारातील ओसाड, खडकाळ व मुरमाड असलेल्या शेतात खरबुज, टरबूजची एका शेतकऱ्याने शेती फुलवली असून काही दिवसात या शेतकऱ्याने जवळपास दोन लाखांचे उत्पन्न घेतले आहे.
वाकोद येथील भगवान राऊत यांची श्रीक्षेत्र चौंडेश्वर शिवारात शेती आहे. ही शेती खडकाळ, मुरमाड व ओसाड होती. राऊत गेल्या ३० वर्षापासून शेती करत आहेत. सुनील राऊत, विनोद राऊत, भगवान राऊत या तिन्ही भावंडांचे एकत्रित कुटुंब असून लाखांचे उत्पन्न घेत त्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. कोरोना काळात २ ते ५ रुपये किलोने विक्री केलेल्या फळांना यंदा बाजारात १० ते १२ रुपये किलोचा भाव मिळत आहे. त्यामुळे हंगामी फळांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे बाजारात टरबूज, खरबूजची मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे. दोन वर्षांपासून कोरोनामुळे लादलेल्या निर्बंधांचा महाराष्ट्रातील टरबूज, खरबूज उत्पादकांना फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. मात्र, आता सर्व निर्बंध हटले असून सर्व बाजारपेठा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. वाढत्या तापमानामुळे टरबुजाची मागणी वाढली असून, भावही चांगला मिळत आहे.