व्हाट्सअप/फेसबूक फेक विद्यापीठमुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात; वाचा सविस्तर

जळगाव लाईव्ह न्यूज । 4 डिसेंबर 2022 । व्हाट्सअप/फेसबूक या सोशल मीडियावर अनेक फेक मेसेजेस व्हायरल होत असतात. या फेक मेसेजेसमुळे अनेकवेळ सामाजिक शांततेला गालबोल देखील लागण्याच्या घटना घडत असतात. सोशल मीडियावर खोटे मेसेज न वाचताच फॉरवर्ड करण्यात येत असल्याने अनेक समस्यांचा जन्म होतो. असाच काही प्रकार जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांसोबत होत आहे. वाचून आश्‍चर्य वाटत असले तरी हे कटू सत्य काय आहे? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जळगाव जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. जळगावच्या कापसाचा डंका केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही वाचतो. गतवर्षी देशभरासह अन्य प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये कापसाचे उत्पादन घटल्यामुळे कापसाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. याचा लाखों शेतकर्‍यांना फायदा झाला. उत्पादनात घट झाल्यानंतरही जास्त दर मिळाल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान काही प्रमाणात भरुन निघाले. गतवर्षी सुमारे ९ हजार ते १३,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता.

यावर्षीही अति पावसामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे. यामुळे गतवर्षा प्रमाणे किंवा त्यापेक्षा जास्त दर मिळतील अशी शेतकर्‍यांना आशा लागून आहे. सध्यस्थितीत बाजारत कापसाला ८५०० ते ९ हजार दरम्यान प्रति क्विंटल दर मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी वाढू लागल्याने कापसाला व्यापार्‍यांकडून मिळणार्‍या दरातही गेल्या १५ नोव्हेंबरपासून वाढ झाली आहे. आठ ते साडेआठ हजारांऐवजी कापसाला नऊ हजार १०० रुपये दर मिळत आहे. भविष्यात जादा दर मिळेल, या अपेक्षेने शेतकरी कापूस विक्रीसाठी तयार नाहीत. एका अंदाजानुसार, खरिपातील सुमारे ८० ते ९० टक्के कापूस शेतकर्‍यांच्या घरातच आहे.

सोशल मीडियामुळे संभ्रम

तज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाला मागणी वाढत असल्याने किंमतीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र हे दर एकदम उसळी घेणार नाहीत. मागणी व पुरवठा या मधील गणितांनुसार दरांमध्ये चढ-उतार दिसून येतील. मात्र मुख्य गोंधळ निर्माण होतोय तो, व्हाट्सअप/फेसबूक फिरणार्‍या फेक मेसेजसमुळे. ‘चीन, पाकिस्तान, बांगलादेशमधील कापूस नष्ट झाला आहे. यामुळे आपल्या कपाशीला ११ ते १५ हजारांचा दर मिळेल, अजून कापूस विकू नका’, ‘घरातच साठा करा’, असे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामुळे शेतकरी कापूस विक्रीबाबत संभ्रमात आहेत. सध्या ८ हजार ५०० ते ९ हजारांचा दर सुरू आहे. तो दर अजून महिनाभर तरी तसाच राहील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.