शेतकरी संवेदना अभियान : शेतकऱ्यांनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका – जिल्हाधिकारी
जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२२ । जळगाव भरारी फाउंडेशनतर्फे शेतकरी संवेदना अभियान अंतर्गत शेतकरी समुपदेशन केंद्राचे उद्घाटन बुधवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी कर्जबाजारीपणामुळे नैराशात गेलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये यासाठी त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी भरारी फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य असून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी शासकीय योजनांच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.
गेल्या आठ वर्षांपासून भरारी फाउंडेशनतर्फे शेतकरी संवेदना अभियान राबविण्यात येत असून याअंतर्गत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेवून त्यांना मदतीचा हात दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून ‘शेतकऱ्यांचे हक्काचे केंद्र या मोफत समुपदेशन केंद्राची सुरुवात करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे.
याप्रसंगी कृषि उपसंचालक अनिल भोकरे, आनंद जीवन स्वामी, मनीष पटेल, राजेश चौधरी, भगवान पाटील, डॉ. राहुल मयुर, डॉ. विलास भोळे, लखीचंद जैन, बाळासाहेब सूर्यवंशी, सपन झुनझुनवाला, पवन जैन, नीलेश जैन, जयदीप पाटील, डॉ. युवराज परदेशी, चेतन वाणी तसेच जिल्ह्यातील आलेली शेतकरी आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक दीपक परदेशी यांनी केले. यशस्वीतेसाठी मोहित पाटील, शैलेंद्र परदेशी, सचिन महाजन, अक्षय सोनवणे, दीपक विधाते, गोपाळ कापडणे आदींनी परिश्रम घेतले..