⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

तोतया तिकीट निरीक्षकाला अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये पडल्या बेड्या

ळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२२ । अहमदाबाद एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात प्रवाशांची तिकिटे तपासून त्यांच्याकडून दंड वसूल करणार्‍या तोतया तिकीट निरीक्षकाला रेल्वे सुरक्षा यंत्रणांनी बेड्या ठोकल्या असून संशयीता विरोधात खंडवा रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज भैयालाला मालवीय (38, गल्ली क्र. 1. गाडगेबाबानगर, अमरावती) असे तोतया तिकीट निरीक्षकाचे नाव आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही आरोपीविरोधात अशाच पद्धत्तीने तिकीट निरीक्षक बनून वसुली केल्याने बडनेरा लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल आहे. आरोपी राज मालवीय हा 19484 बरोनी-अहमदाबाद एक्स्प्रेसच्या जनरल कोचमधील प्रवाशांकडील तिकीट तपासत त्यांना नकली पावती पुस्तकाद्वारे दंडही आकारत होता. ही बाब गाडीतील तिकीट निरीक्षक सी.डी.ताडा व अनिलकुमार झा, एस.आय.चौधरी, एस.आय. ए.के.तिवारी यांच्या लक्षात येताच त्यांनी मालवीय यास पकडले. संशयीताला ओळखपत्र विचारल्यानंतर ते आढळले नाही तर आरोपीच्या काळ्या रंगाच्या बॅगमधून पॅन कार्ड व दंड वसुलीचे बनावट पासबुक जप्त करण्यात आले. या पुस्तकात 54 पाने आणि ज्यात पहिल्या पानावर 300 रुपये दंडाची पावती आढळली.

आरोपी मालवीय याला भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर स्टेशन निरीक्षक आर.के.मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफचे एसआय ए.के. तिवारी, एएसआय प्रेम चौधरी, जय कुमार, नथू पडघन, एच. सी. सरोदे, एच. सी. पाचपोर यांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीविरोधात खंडवा लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.