जळगाव लाईव्ह न्यूज । राज्य उत्पादन शुल्क विभागाने अमळनेर येथील आर.के. नगर परिसरात सुरू असलेला बनावट देशी-विदेशी दारू निर्मितीचा कारखाना उध्वस्त करत ३ लाख १ हजार ७३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जी. एस. मोरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मांडळ–जवखेडा रस्त्यावरील एका विहिरीजवळ भावलाल सुखदेव पारवे (वय ३०, रा. नवलनगर) हा अवैधरीत्या देशी-विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता आर.के. नगर येथील दिनेश प्रभाकर खांबायत हा बनावट दारू तयार करत असल्याचे समोर आले.

या माहितीनंतर निरीक्षक मोरे यांच्या पथकाने रात्री ९ वाजून १० मिनिटांनी आर.के. नगरमध्ये छापा टाकला. कारवाईदरम्यान पथकाला १० हजार ५६० रुपयांच्या ४८ विदेशी दारूच्या बाटल्या, १ हजार २१० रुपयांच्या ६१० देशी दारूच्या बाटल्या तसेच ४ हजार रुपयांचा एक सीलबंद बॉक्स असा एकूण ३ लाख १ हजार ७३५ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. हा सर्व साठा जप्त करण्यात आला.

या कारवाईत निरीक्षक अ. कै. सु. मोमीन, विपुल राजपूत, दिनेश पाटील, भूषण परदेशी आणि सुषमा सुल्ताने यांनी सहभाग घेतला. संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.








