जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२५ । जळगाव पोलिसांनी पारोळा तालुक्यातील बहादरपूर शिवारात, बोरी नदीच्या काठावर सुरू असलेल्या एका मोठ्या बनावट देशी दारूच्या कारखान्यावर धाड टाकून तब्बल ४० लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बहादरपूर शिवारात, बोरी नदीच्या काठावर हा अड्डा सुरु होता. या ठिकाणी ‘टँगो पंच’ या नावाने बनावट देशी दारूची निर्मिती आणि पॅकिंग सुरू होती.

असा केला मुद्देमाल हस्तगत?
कारखान्यात तयार विक्रीसाठी ३१०० सीलबंद बाटल्या (किंमत ₹1.24 लाख), ७०० विक्रीपूर्व अवस्थेतील बाटल्या (₹28,000), ८०० लीटर स्पिरीट (₹3.55 लाख), १५०० लीटर तयार दारू (₹3 लाख), RO व CNC मशिन्स (प्रत्येकी ₹5 लाख), पाणी लिफ्टिंग मशीन, इलेक्ट्रिक स्टॅबिलायझर, ३० हजार टँगो पंच बुच, ६१,२०० रिकाम्या बाटल्या (₹6.12 लाख), विविध आकाराच्या पाण्याच्या टाक्या, मिक्सर मशीन, इलेक्ट्रिक स्टार्टर्स, बोलेरो मालवाहू वाहन (₹5 लाख), स्विफ्ट डिझायर कार (₹5 लाख) तसेच लोखंडी पत्र्याचे ४० बाय ४० फुटांचे शेड (₹5 लाख) असा एकूण ₹40,33,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी राकेश जैन, टिंन्या डोंगऱ्या पावरा आणि कतार सिंग पावरा या तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत असले तरी, संबंधित विभागांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.









