जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ ऑगस्ट २०२१ । दुचाकीच्या मागच्या चाकात स्कार्फ अडकल्याने अपघात होऊन महिलेचा मृत्यू झाल्याची घटना यावल-फैजपूर रोडवरील चितोडा गावानजीक घडली. कल्पना अनिल सोनवणे (वय-३९) रा. यावल असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत असे की, कल्पना सोनवणे या तालुक्यातील डोंगरकठोरा येथील उपप्राथमिक आरोग्य केंद्रात मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. आज सोमवारी २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने पती अनिल सोनवणे यांच्यासोबत (एमएच १९ बीएच ५८६५) ने कामावरून यावल येथे येत असतांना चितोडा गावाजवळील रस्त्यावर त्यांच्या गळ्यातील स्कार्प अचानक दुचाकीच्या मागच्या चाकात अडकला. त्यामुळे कल्पना सोनवणे ह्या जमीनवर पडल्या. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी यावल ग्रामीण रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला यांनी मयत घोषीत केले.
मयत पावलेल्या कल्पना सोनवणे आणी त्यांचे पती अनिल सोनवणे हे दोघ ही डोंगर कठोरा येथे मागील दहा वर्षापासुन शासकीय नोकरीस आहेत. त्यामुळे दोघे पतीपत्नी नियमित डोंगरकठोरा ते यावल आपल्या दुचाकी वाहनाने ये जा करत होते.