जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । दहावी, बारावी म्हटली म्हणजे विद्यार्थांच्या मनात करिअरचे स्वप्न आणि परीक्षेची धास्ती निर्माण होणे सहाजिकच आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने इतरांप्रमाणे विद्यार्थ्यांनाही घरी राहण्याची सवय लावली म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना अचानकच परीक्षेचा ताण येणे देखील यातीलच एक भाग म्हणायला हरकत नाही. सोबतच प्रशासन देखील परीक्षेच्या तयारीला लागलं असून बऱ्यापैकी नियम निर्बंधांचे पालन करून परीक्षा दिल्या जातील ह्या दिशेने कार्य सुरु आहे. ऑनलाईन अभ्यास असल्याने ऑफलाईन परीक्षेची मनात भीती असेल तर ती दूर करीत आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याचा सल्ला शिक्षकांनी दिला आहे.
राज्यात यंदा जवळपास ३१ लाख विद्यार्थी दहावी आणि बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असल्यानं बोर्डाकडून जोरात तयारी करण्यात आली आहे. कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करा, असे आदेश बोर्डाकडून देण्यात आले आहेत. परीक्षेदरम्यान बोर्डाकडून हवी ती मदत पुरवली जाईल. परीक्षा व्यवस्थित पार पाडा, असे आदेश बोर्डाकडून महामंडळाला देण्यात आले आहेत.
नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाने मुख्याध्यापक महामंडळाची बैठक घेतली. यावर्षी शाळा तिथं केंद्र असल्यानं बोर्डानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रावरील पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
देखील देण्यात आले आहे.
कोरोना आणि इतर कारणामुळे अडचण आल्यास ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होणार असून दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी कोरोनोमुळे मंडळ परीक्षा शुल्क आकारणार नाही. दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत घेण्यात येणार आहेत.
लॉकडाऊनमुळे विद्यार्थी लिखाणापासून खूप लांब गेलेले असून लिखाणाचा सराव कमी झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होत असून प्रशासनाने देखील या अडचणीची दाखल घेत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्धातास वाढवून दिला आहे. तर विद्यार्थ्यांनी यानुसार नियोजन केलं पाहिजे व महत्वाचे मुद्दे व नोट्स काढून अभ्यास केला पाहिजे. ऑनलाईन आणि ऑलाईनच्या भानगडीत असलेल्या विद्यार्थ्यांनी या आधी देखील ऑफलाईन परीक्षा दिलेल्या आहेत. म्हणून त्यांना परीक्षा हा काही नवा प्रकार नसावा त्यांनी घाबरून जायचं कारण नाही. विद्यार्थ्यांना भविष्यात देखील ऑफलाईन परीक्षांना सामोरे जायचं आहे म्हणून याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून शिक्षक देखील तयार आहेत, असे शेठ ला.ना.शाळेचे उपशिक्षक हिम्मत काळे यांनी सांगितले.
सकारात्मक विचार ठेवून परीक्षेला सामोरे जा कारण पहिल्या पेपरनंतर तुम्हाला स्वतःलाच खूप आत्मविश्वास वाटेल की परीक्षा सोपी आहे. त्यामुळे अगोदरच कोणत्याही प्रकारची भीती मनात बाळगू नका, यश तुमचेच आहे, असे अस्तित्व कोचिंग क्लासेसचे संचालक चेतन वडनेरे यांनी सांगितले.