जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे शनिवारी एका कार्यक्रमानिमित्त जळगावात आले होते. मेहरूण परिसरातील कार्यक्रम आटोपल्यावर ना.धनंजय मुंडे व महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यात महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थानी बंदद्वार चर्चा झाल्याने मनपातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, महापौर जयश्री महाजन यांनी ही भेट केवळ औपचारिक असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमच्या घरी सदिच्छा भेट दिल्याचे त्यांनी ‘जळगाव लाईव्ह’शी बोलताना सांगितले.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे शनिवार दि.७ मे रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. लहानशा दौऱ्यात त्यांनी अक्षरशः जिल्ह्यातील दोन तालुके पिंजून काढले. सायंकाळी धनंजय मुंडे यांचा मेहरूण परिसरात लाड वंजारी समाज बांधवांतर्फे भव्य सत्कार करण्यात आला. ना.धनंजय मुंडे यांच्या कार्यक्रमात जोरदार भाषण झाल्यावर दोन दिग्गज नेत्यांनी महापौर जयश्री महाजन यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
महापौर जयश्री महाजन यांच्या घरी ना.धनंजय मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्यात बंदद्वार चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून कोणता नगरसेवक कुठे जातो? कोणता नेता राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चांना संपूर्ण मनपा वर्तुळात उधाण आले आहे. यातच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेतली. यावेळी स्वतः एकनाथराव खडसे याठिकाणी उपस्थित होते. या भेटीदरम्यान खडसे-मुंडेमध्ये ज्याप्रकारे बंदद्वार चर्चा झाली या चर्चेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
एकनाथराव खडसे व धनंजय मुंडे या दोघांची नक्की काय चर्चा झाली यासंदर्भात कित्येक कयास बांधले जात आहेत. लवकरच याचे गुपित समोर येईल असे देखील म्हटले जात आहे. दरम्यान, याबाबत महापौर जयश्री महाजन यांच्याशी चर्चा केली असता, मेहरूण परिसरात एका कार्यक्रमानिमित्त ना.धनंजय मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे हे आले होते. कार्यक्रम घराजवळच असल्याने त्यांनी आमच्या घरी भेट दिली. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असल्याने ही भेट सदिच्छा भेट होती. जळगावच्या प्रथम नागरिक म्हणून ना.मुंडे यांचे स्वागत करणे हे माझं कर्तव्य होतं आणि ते मी बजावले. त्यामुळे यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.