⁠ 
बुधवार, मे 1, 2024

Exclusive : आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात चोरट्यांची चांदी, अनेकांचे खिसे कापले!

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे शिवसंवाद यात्रेनिमित्त जळगाव सुवर्णनगरीत आगमन झाले असता जळगावात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (NCP) आकाशवाणी चौकात भव्य व्यासपीठ उभारून आदित्य ठाकरेंचे जंगी स्वागत झाले. स्वागतासाठी मोठ्याप्रमाणात गर्दी झाल्यानंतर चोरट्यांनी देखील संधीचे सोने केले. गर्दीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पदाधिकारी, एक पत्रकारासह आणखी एकाचा मोबाईल चोरी झाले आहे. रामानंद नगर पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. During Aditya Thackeray’s visit, thieves cut the pockets

जळगावात एखाद्या मोठ्या नेत्याची रॅली निघाली आणि त्यात चोरट्यांनी संधी साधली नाही असे होतंच नाही. आज जिल्हा दौऱ्यावर असलेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात देखील चोरट्यांनी हात साफ केला. काही वर्षापूर्वी आदित्य ठाकरे यांची जळगावात सभा झाली असता चोरट्यांनी डाव साधला होता. शनिवारी आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला गर्दी होणारच हे निश्चित असल्याने मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. सुदैवाने दौऱ्याला कुठेही गालबोट लागले नसले तरी चोरट्यांनी मात्र गर्दीत डाव साधला.
हे देखील वाचा : शिंदे सरकारमध्ये गद्दारांना त्यांची लायकी समजली : आदित्य ठाकरे

आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शिवसैनिकांच्या गर्दीत शिरलेल्या चोरट्यांनी अनेकांचे खिसे कापले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या खिशावरच चोरट्यांनी डल्ला मारला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी यांचे पाकीट चोरट्यांनी लंपास केले. पाकिटात ४ हजार ५०० रुपये रोख, आधार, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड असे साहित्य होते. राष्ट्रवादीचे पदाधिकारी सलीम इनामदार यांच्या खिशातून चोरट्यांनी २८० रुपये रोख लंपास केले. पत्रकार राहुल शिरसाळे यांचे पाकीट चोरट्यांनी चोरले. पाकिटात २ हजार रोख, वाहन चालविण्याचा परवाना, एटीएम कार्ड आणि पासपोर्ट फोटो असे साहित्य होते. पंकज वामन भंगाळे यांचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल देखील गर्दीत गहाळ झाला आहे.

एखादा मंत्री आला आणि जिल्ह्यासाठी खूप काही देऊन गेला असे नेहमी ऐकण्यात येते. बऱ्याचदा नेत्यांच्या दौऱ्यात चोरटे देखील संधी साधतात. जळगाव दौऱ्याच्या निमित्ताने युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी निष्ठावान शिवसैनिकांशी संवाद साधला तर विरोधकांवर खापर फोडले. जळगाव जिल्ह्यासाठी दौऱ्याचा काही फायदा होवो अथवा नको पण चोरट्यांची मात्र चांदी झाली आणि पोलिसांना चपराक बसली.