जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२५ । यंदा एप्रिल महिन्यातच तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने एप्रिलमध्येच ‘मे हिट’च्या तडाख्यासारखे ऊन जाणवले. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीलाच वातावरणात अचानक बदल पाहायला मिळाला. गारपिटीसह अवकाळी पाऊस झाल्याने तापमानात घसरण झाली असली तरी 1 मे ते 10 मे या कालावधीत हतनूर धरणातून 3.63 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन नोंदवले गेले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 0.19 दलघमीने बाष्पीभवनात वाढ झाली आहे. या दहा दिवसांत फक्त ६ व ७ मे रोजी ढगाळ वातावरणाने बाष्पीभवनाचा वेग कमी होता.दरम्यान, गतवर्षी १० मे २०२४ रोजी धरणात ४२.०४ टक्के, तर यंदा ४०.५९ टक्के साठा आहे.

भुसावळ शहर व विभागातील ११० गावे, औद्योगिक प्रकल्प, नगरपालिका क्षेत्रांची तहान भागवणाऱ्या हतनूर धरणात गतवर्षापेक्षा यंदा सरासरी दोन टक्के कमी साठा आहे. तरीही हा साठा जूनअखेर पर्यंत टिकणार आहे. 2024 मध्ये याच कालावधीत 3.44 दलघमी बाष्पीभवन झाले होते. गेल्या वर्षी 2 मे 2024 रोजी 0.43 दलघमी, तर 2 मे 2025 रोजी 0.47 दलघमी बाष्पीभवन झाले. त्यामुळे यावर्षी 0.04 दलघमीने बाष्पीभवनात वाढ झाल्याचे निरीक्षण आहे.
हतनूर धरणाचा सध्या जलसाठा मागील वर्षीच्या तुलनेत 1.31 टक्क्यांनी कमी आहे. पाण्याची एकूण पातळी 0.075 दलघमीने घटली असून, जिवंत साठ्यात 3.5 दलघमीने घट नोंदली गेली आहे. 10 मे रोजी जलसाठा 1.81 टक्क्यांनी कमी असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले.
हतनूर धरणातून यावर्षी चार आवर्तन सोडण्यात आली आहेत, जी गेल्या वर्षासारखीच आहेत. मात्र बिगर सिंचनासाठी 2024 मध्ये पाच आवर्तने झाली होती, तर 2025 मध्ये आठ आवर्तने करण्यात आली आहेत. यातील तीन आवर्तने केवळ बिगर सिंचनासाठीच होती. दि. 10 मे रोजी सायंकाळी चार वाजता आणखी एक आवर्तन पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक वापरासाठी सोडण्यात येणार आहे. हतनूर धरणाचे सहाय्यक अभियंता भावेश चौधरी यांनी सांगितले की, “यावर्षी 2 मे रोजी सर्वाधिक बाष्पीभवन झाले आहे.”