जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । शहरातील रस्त्यांची कामे गुणवत्ता पुर्ण झाली पाहिजे, पचवीस वर्षानंतर शहरात रस्त्यांची कामे होत असून कामांच्या गुणवत्तेत तडजोड करु नये, अभियंत्यांनी मक्तेदाराची दलाली करु नये, अशा शब्दात महापौर जयश्री महाजन यांनी मनपाच्या अभियंत्यांना सुनावले.
महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनिल महाजन यांनी बुधवारी दुपारी ४ वाजता मनपाच्या सतराव्या मजल्यावर बांधकाम विभागातील सर्व अभियंत्यांची बैठक घेतली. या बैठकीत शहरात सुरु असलेल्या सर्व कामांचा आढावा घेण्यात आला. सध्या स्थितीत सुरु असलेली कामे, पुर्ण झालेली कामे व मक्तेदारांना कार्यादेश देऊनही सुरु न झालेल्या कामांची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी घेतली असता शहरातील २२ कामे कार्यादेश देऊन देखील सुरु झालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबधित २२ कामांच्या मक्तेदारांना ८ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला असून आठ दिवसात कामे सुरु न झाल्यास त्या मक्तेदारांना ५ वर्षासाठी ब्लॅक लिस्ट करण्याचे आदेश महापौर जयश्री महाजन यांनी शहर अभियंता विलास सोनवणी यांना दिले आहेत.
रस्त्यांची ७४ कामे अर्धवट
पावसाळा सुरु होण्यापुर्वी शहरातील सर्व रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे आव्हान मनपा पदाधिकारी व प्रशासनापुढे उभे राहिले आहे. असे असतांना शहरात सुरु असलेल्या ४७ कोटींमधील रस्त्यांच्या कामांमध्ये मक्तेदारांकडून दिरंगाई होत आहे. एकुण १६८ कामे शहरात सुरु असून यापैकी ७२ कामे पुर्ण झालेली आहेत. तर, ७२ कामे ५० ते ६० टक्के पुर्ण झाले असून २ कामे १० ते २० टक्के झालेली आहेत. तसेच २२ कामांना अद्याप सुरुवातच झालेली नाही, त्यामुळे महापौर जयश्री महाजन यांनी बांधकाम विभागाची बैठक घेऊन अभियंत्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. यावेळी कामाच्या गुणवत्तेविषयी महापौर जयश्री महाजन चांगल्याच संतापल्या असून त्यांनी मक्तेदारांची दलाली करु नका, अशा शब्दात अभियंत्यांना खडसावले आहे.