⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | जळगाव जिल्हा | Election : ग.स.वर फडकला ‘सहकार’चा झेंडा, उदय पाटील अध्यक्ष तर रविंद्र सोनवणे उपाध्यक्ष

Election : ग.स.वर फडकला ‘सहकार’चा झेंडा, उदय पाटील अध्यक्ष तर रविंद्र सोनवणे उपाध्यक्ष

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२२ । आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग.स.सोसायटीच्या अध्यक्षपदी मोठ्या राजकीय घडामोडीनंतर सहकार गटाने आपला झेंडा फडकावला आहे. अध्यक्षपदी सहकार गटाचे उदय पाटील आणि लोकसहकार गटातून निवडणूक लढविलेले रविंद्र सोनवणे यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. ६ पैकी ५ संचालकांनी सहकार गटाला पाठिंबा देण्याचे आमच्या बैठकीत ठरलेले असताना ऐनवेळी निर्णय बदलला त्यामुळे मी सहकार गटासोबत आल्याची माहिती रविंद्र सोनवणे यांनी दिली. तर आमच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून आमच्या जीवाला धोका आहे. पोलीस बंदोबस्त मिळाल्याशिवाय आम्ही घरी जाणार नसल्याची माहिती नवनियुक्त अध्यक्ष उदय पाटील यांनी दिली आहे.

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी असलेल्या संस्थेची निवडणूक प्रक्रिया काही दिवसांपूर्वी पार पडली होती. निवडणुकीच्या मैदानात सहकार गट, लोक सहकार गट आणि प्रगती शिक्षक सेना असे तीन गट उतरले होते. मतदारांनी एकही गटाला एकहाती सत्ता न दिल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. निकालानंतर सहकार गटाचे ९, लोकसहकार गटाचे ६, प्रगती शिक्षक सेनेचे ६ संचालक निवडून आले होते. अध्यक्षपदाचा जादुई आकडा गाठण्यासाठी ११ संचालक आवश्यक होते. सहकार गटाने लोकसहकार गटाचे दोन संचालक गळाला लावल्याने अध्यक्ष निवडीपूर्वी मोठा गोंधळ उडाला होता. तिन्ही गटाच्या संचालकांमध्ये हमरीतुमरी झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. पोलीस बंदोबस्तात सहकार गटाचे सदस्य सभागृहात गेले होते.

निवडणुकीनंतर सहकार गटाने पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत नवनियुक्त अध्यक्ष उदय पाटील, उपाध्यक्ष रविंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर पाटील यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. उदय पाटील म्हणाले, आम्ही मतदारांना कोणत्याही प्रकारचे आमिष दिले नाही. इतरांनी साड्या वाटप केल्या. आमीष दिले. आमचा उद्देश स्पष्ट असल्याने मतदारांनी आम्हाला निवडून दिले. आज अध्यक्षपदासाठी मतदानाला येत असताना आमच्यावर प्राणघातक हल्ला झाला. गाडीच्या काच फोडण्याचा प्रयत्न झाला. इतके घाणेरडे राजकारण मी आजवर पाहिले नाही. भविष्यात देखील आमच्या जीवाला धोका असू शकतो. मी पोलीस अधिक्षकांशी याबाबत बोललो असून आम्हाला घरी जाण्यासाठी पोलीस बंदोबस्त आवश्यक असल्याचे सांगितले आहे. आम्हाला आमची सरकारी नोकरी हि महत्वाची असून ग.स.म्हणजे काही आमचे पोट भरण्याचे साधन आहे असे नसल्याचे ते म्हणाले.

उपाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी, सहकार गटाला ९ तर आमच्या लोकसहकार गटाला ६ जागांवर विजय मिळाला होता. विजयानंतर आमच्या गटाची बैठक झाली असता ६ पैकी ५ संचालकांनी सहकार गटाला पाठिंबा देण्याचे निश्चित केले होते. उदय पाटील यांना ग.स.च्या कामकाजाचा अनुभव आहे. सहकार गटाच्या जागा अधिक आहे. गेल्या काळात उदय पाटील यांनी केलेल्या कार्याची आम्हाला माहिती असल्याने त्यांना मत देण्याचे ठरवले होते. ऐनवेळी प्रगती आणि लोकसहकार गटाने एकत्र येत निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्याने आम्ही देखील त्याबाबत अनभिज्ञ होतो, असे रविंद्र पाटील म्हणाले.

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/3205704719693289
author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.