जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२२ । जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेची निवडणूक जाहीर झाली आहे. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दूध संघामध्ये सर्वपक्षीय पॅनल बनेल असे म्हटले जात होते. मात्र आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसे यांच्या सोबत कोणतीही युती किंवा आघाडी होणार नाही. असे स्पष्ट संकेत दिल्याने आता एकनाथराव खडसे यांनी अजून एक प्लॅन आखला आहे. भारतीय जनता पक्षाची गोची करण्यासाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी निवडणूक दूध संघाची होणार असल्याचे म्हटले जात आहे.
अधिक माहिती अशी की, एकनाथराव खडसे यांच्यासोबत कोणताही प्रकारची युती किंवा आघाडी होणार नाही असे स्पष्ट संकेत मंगेश चव्हाण यांनी दिल्यावर एकनाथराव खडसे यांची गोची होईल असे म्हटले जात होते. मात्र एकनाथराव खडसे यांनी भाजपावर आता पलटवार केला असून महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना दूध संघात दिसून येणार आहे.
गेल्या सात वर्षांपासून दूध संघात एकनाथ खडसे यांच्या गटाची सत्ता आहे. त्यात सुरुवातीच्या ६ वर्षात दूध संघात कोणत्याही मोठ्या घडामोडी घडल्या नाहीत. मात्र, गेल्या तीन महिन्यांत दूध संघाचे राजकारण तापले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या ठिकाणी प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच अनेक प्रकरणांत चौकशी देखील लावली. त्यात एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात चांगल्याच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झाडल्या गेल्या.
त्यामुळे दूध संघाची निवडणूक जिल्ह्यातील या दोन्ही नेत्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असून, दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे आगामी काळात राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी बद्दल अजून कोणतीही चर्चा झालेली नाही. शिर्डी येथील अधिवेशन झाले कि पुढचा निर्णय घेण्यात येईल.
एकनाथराव खडसे, आमदार