⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

…तर फडणवीस लगेच सत्ता स्थापनेसाठी तयार होतील ; खडसेंचा सणसणीत टोला

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जून २०२१ । भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून ते अस्वस्थ आहेत.  त्यांची तळमळ दिसून येत आहे, त्यामुळे जर त्यांना एखाद्या पक्षाने  ऑफर दिली तरी ते सत्ता स्थापन करतील, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी लगावला.

एकनाथ खडसे यांनी आज सकाळी महसूल मंत्री बाळसाहेब थोरात यांची शासकीय निवास्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना खडसे यांनी महाविकास आघाडी सरकार पडणार का यासह इतर विषयावर भाष्य केले.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. सरकार भक्कम आहे, त्यामुळे सत्ता न आल्यामुळे भाजप आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, आपलं सरकार येणार असं आमदारांना सांगून वेळ काढला जात आहे, भाजपमध्ये अनेक नाराजांची संख्या वाढू नये म्हणून भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू आहे, असं खडसे म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याच्या चंद्रकांतदादांनी दोन तारखाही दिल्या. फडणवीसांनीही तारीख निश्चित केली होती. पण काही होत नाही. सरकार काही जात नाही. विरोधक वाट बघत आहेत. ते वाटच बघत राहतील, असाही टोला त्यांनी लगावला.

अजितदादांसोबत सत्ता स्थापन करणे ही चूक होती असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावरूनही खडसेंनी त्यांच्यावर टीका केली. फडणवीस अस्वस्थ आहेत. कोणत्याही कारणाने सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजितदादांसोबत सरकार स्थापन केलं. आता त्यांनी चूक मान्य केली आहे. पण चूक मान्य केल्यानंतरही अजूनही असा प्रसंग आला किंवा एखाद्या पक्षाने त्यांना ऑफर दिली तरी ते सत्ता स्थापन करतील, असा टोला त्यांनी लगावला.