जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२२ । विधान परिषद निवडणूक आटोपल्यानंतर नॉट रिचेबल असलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदाच समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले असून, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही असे स्पष्ट केले आहे. शिंदे यांनी ट्विट करीत अद्यापही सस्पेन्स कायम ठेवला आहे.
वर्षभरापासून नगरविकासमंत्री एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहेत. त्यांच्या गटातील अनेक आमदार देखील महाविकासआघाडीवर नाराज आहेत.राज्यसभेनंतर कालच विधान परिषदेत देखील भाजपने महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. आपल्या अपयशाची कारणे शोधण्यासाठी शिवसेनेने आज बैठकीचे आयोजन केले होते.
दरम्यान, काल सायंकाळपासून नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे त्यांच्या गटातील आमदार नॉटरिचेबल असल्याचे म्हटले जात आहे. याची खबर मातोश्रीवर पोहोचताच उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आमदारांच्या विशेष बैठकीचे आयोजन केले होते मात्र या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदेसह आमदार नॉटरिचेबल असल्यामुळे त्या ठिकाणी आली नाहीत यामुळे आता ते कोणचा टोकाचं पाऊल उचलतात का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत अद्याप किती आमदार आणि मंत्री आहेत हे स्पष्ट होऊ शकले नाही. एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेच्या बैठकीत कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिंदे यांना गटनेते पदावरून हटविण्याचा निर्णय झाल्यावर शिंदे यांनी हे ट्विट केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमुळे ते शिवसेनेतून बाहेर पडणार कि नाही हे अद्याप निश्चित नसले तरी भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे.