⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | एकनाथ शिंदे, फडणवीस, अजितदादा 26 ऑगस्टला पाचोऱ्यात

एकनाथ शिंदे, फडणवीस, अजितदादा 26 ऑगस्टला पाचोऱ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ९ ऑगस्ट २०२३ | राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी २६ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ पाचोरा येथे येणार आहे, अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यभरात शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत असला तरी तालुकास्तरावरील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम जिल्हास्तरावर राबविला जात असून, त्याला मिळणारा प्रतिसाद व शासनाच्या योजनांचा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणारा लाभ विचारात घेऊन तालुकास्तरावरही हा उपक्रम घेण्याचे निश्चित केले आहे. पाचोरा व भडगाव या दोन्ही तालुक्यांसाठीचा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम येत्या २६ ऑगस्टला पाचोरा येथे होत आहे.

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आमदार किशोर पाटील यांनी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. तालुकास्तरावरील हा पहिलाच प्रयोग यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. एम. एम. महाविद्यालयाचे क्रीडांगण ही या कार्यक्रमासाठीची जागा निश्चित करण्यात आली.

सर्व विभागांच्या शासकीय अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तयारी जवळपास पूर्णत्वास आणली आहे. तालुकास्तरावरील हा पहिलाच कार्यक्रम यशस्वी करण्याचा व राज्यभरात तालुकास्तरावरील कार्यक्रम आदर्श पॅटर्न ठरेल, या दृष्टिकोनातून तयारीला गती देण्यात आली आहे. पाचोरा व भडगाव तालुक्यांतील जनतेने यासाठी उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले आहे.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.