जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला १५०० रुपये जमा करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वीच नोव्हेंबरचे महिन्याचे दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. यानंतर आता डिसेंबर संपून जानेवारीचा पहिला आठवडादेखील संपत आला तरीही लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला नाही.

महिलांना पैसे कधी मिळणार असा प्रश्न सतावत आहे. याचसोबत सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आहे. ही निवडणूक संपल्यानंतर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नसल्याचे अनेकजण सांगत आहेत. निवडणुकीनंतर हप्ता बंद होईल, असा आरोप विरोधकांनी केली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
निवडणुकानंतर लाडकी बहीण योजना बंद होईल, असा आरोप विरोधकांनी केला असून त्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना आश्वासन दिले आहे. लाडक्या बहिणींना विधानसभा निवडणुकीत चमत्कार दाखवला आहे. मी गरीबी पाहिली, काटकसर पाहिली. अनेकजण योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले, खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी जोडा हाणला आहे. कोणीही ही योजना बंद पाडू शकच नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी केले आवाहन
सध्या राज्यात निवडणुकीनिमित्त अनेक प्रचारसभा होतात. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, राज्यातील ५० लाख लाडक्या बहिणींना लखपती दीदी करणार, असं त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत महिलांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे.







