जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२४ । जामनेरमध्ये झालेल्या शरद पवार गटाच्या शिव स्वराज्य यात्रेत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांच्यावर घणाघाती टीका केलीय. गिरीश महाजन यांना गुरमी असून त्यांना माज आला आहे. त्यांची जागा दाखवा, अशी टीका केली.
तसेच रखडलेल्या भाजप प्रवेशावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आता गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असे देवेंद्र जी म्हटले होते मात्र माझ्या दृष्टीने आता भाजप प्रवेश हा गणपती बाप्पा बरोबर विसर्जित झाला असल्याचं खडसे म्हणाले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचं खडसे म्हणाले. त्यामुळे नाथाभाऊच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला ब्रेक लागला आहे. महाजन आणि खडसे यांच्या वादामुळे यंदाची विधानसभा चुरशीची ठरणार आहे. खडसे यांनी या सभेत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या दिलीप खोपडे यांना पाठिंबा देत महाजन यांना चीतपट करण्याच्या चंग बांधल्याचं दिसून आले.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश झाला असल्याचे फोटो देखील व्हायरल झाले होते. मात्र अद्याप त्यांचा भाजप प्रवेश रखडलेला आहे. त्यांनी गिरीश महाजन यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भाजप प्रवेश रखडलेला असल्याचं म्हटलं होते.
दरम्यान, शरद पवार गटाच्या कार्यक्रमात खडसे यांनी उपस्थिती लावल्याने आणि महाजन यांच्यावर खरमरीत टीका केल्याने ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना ब्रेक लागलाय. त्यावर स्वत: खडसेंनी प्रतिक्रिया दिलीय. मी आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्थायी आहे. सदस्य आहे आणि यापुढेही ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय काम करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचं खडसे म्हणाले. आता भाजप प्रवेश हा गणपती बाप्पा बरोबर विसर्जित झाला असल्याचं खडसे म्हणाले.
महाजनांवर खरमरीत टीका
कार्यक्रमात बोलतांना खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ही निवडणूक आरपारची निवडणूक आहे. त्यावेळेस गिरीश महाजन माझे पाय धरायचे आणि सांगायचं की मला वाचवा. मी सभा घेतली त्यामुळे त्यावेळेस ते निवडून आले होते. आता गिरीश महाजन यांना आणून मी पाप केलं असं मला वाटतं. ज्याला मोठे केले, ते सद्गृहस्थ वाटले होते, त्याची अलीकडची वर्तणूक पाहिली की पाप केले असे वाटते. या मतदारसंघात मी काम केले आहे, आज सरकार कोणाचेही असले तरी त्याचे श्रेय आपले आहे. आज मंत्री असले तरी यांनी काय केले, असा सवाल खडसे यांनी गिरीश महाजन यांना या सभेत केला. आज गावात रस्ते नाही, मुतारी बंद, ग्रामविकास मंत्री तुम्ही तुमचे लक्ष कुठे? असे प्रश्नही त्यांनी गिरीश महाजन यांना विचारलेत.