⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

चंद्रकांत पाटलांच्या त्या विधानावर एकनाथराव खडसेंनी हाणला टोला ; म्हणाले…

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२१ ।  पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर वाघाशी मैत्री करायला आवडेल, असे विधान करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जोरदार टोला हाणला आहे. चंद्रकांत पाटील हे आपल्या मतावर कधीही ठाम नसतात. त्यांची मते दररोज बदलत असतात, अशा शब्दांत खडसे यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त मुक्ताई निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीच्या वाटचालीवर बोलतानाच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण प्रश्नी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी, ‘आम्हाला वाघाशी मैत्री करायला आवडेल’, असे वक्तव्य केले होते. 

त्यावर प्रतिक्रिया देताना आज एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांना चिमटा काढला. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील मतावर कधीही ठाम नसतात. त्यांची मते दररोज बदलत असतात. त्यांनी आजपर्यंत ठामपणे भूमिका घेतलेली नाही. आता सांगितले, नंतर बदलले, असा मला अनुभव आहे. त्यांना मैत्री करायची असेल तर त्यांनी करावी, त्यांच्याकडे जावे, असा टोलाही खडसे यांनी यावेळी लगावला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजवर २२ वर्षांच्या वाटचालीत अनेक चढउतार अनुभवले आहेत. पक्षाच्या वाटचालीवर नजर टाकली तर सर्वांनी पक्ष विस्तारासाठी परिश्रम घेतल्याचे दिसून येते. मात्र, अजूनही पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पक्षाची वाटचाल २२ वर्षांची झाली आहे, म्हणजे पक्ष आता तारुण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी पक्ष अधिकाधिक लोकांपर्यंत जावा म्हणून प्रयत्न करायला हवेत, असे आवाहनही त्यांनी केली.