⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

.. त्यावेळी मी पोलिसांचा मारही खाल्लेला आहे ; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर खडसेंची प्रतिक्रिया

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२३ । भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक खळबळजनक दावा केला असून शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे यांचा बाबरी मशीद पाडण्यात काडी मात्र संबंध नाही, असं ते म्हणाले आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांना धारेवर धरलं आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले खडसे?
आयोध्येत श्रीराम मंदिर बांधण्यासाठी जी काय बाबरी मशीद तोडली त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. दोन वेळा मी कार सेवक म्हणून अयोध्यामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी पोलिसांचा भरपूर मार ही मी खाल्लेला आहे असं खडसे म्हणले. तसेच कोण यामध्ये होतं, कोण नव्हतं हे मला माहित आहे. कारण मी दोन्ही वेळा गेलो, पंधरा दिवस मी तुरुंगामध्ये होतो. त्यामुळे मला माहित होतं की कोण कोणत्या पक्षाचे कोणते लोक त्या ठिकाणी होते. यामुळे या विषयावर अधिक न बोललेलं बरं.

दरम्यान, राज्यात २०२४ मध्ये पुन्हा महाविकास आघाडी सत्तेत येईल असंही एकनाथ खडसे म्हणाले. राज्यात तीनही पक्ष एकत्र राहतील आणि महाविकास आघाडी मजबूत आहे. तीन पक्ष एकत्र राहणं अवघड असल्याचं चंद्रकांत दादांचं म्हणणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. यावेळी त्यांनी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ३२ पक्ष एकत्र होते याचं उदाहरण सांगितलं. जर ३२ पक्ष एकत्र राहिले असतील तर तीन पक्ष एकत्र न राहण्याचं कारण काय असा प्रश्न त्यांनी विचारला.