⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

किचनचे बजेट आणखी कोलमडणार, खाद्यतेलाच्या किंमती महागणार?, जाणून घ्या कारण

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । सध्या इंडोनेशिया प्रचंड महागाईने होरपळत आहे. देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि वाढत्या किमती रोखण्यासाठी इंडोनेशियाने 28 एप्रिलपासून पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली. भारतातील सुमारे 60% पाम तेल इंडोनेशियामधून येते. निर्यात बंद झाल्यामुळे, भारतातील खाद्यतेलाच्या संकटामुळे किमती वाढू शकतात.

बंदी अगोदर पामतेल प्रति 10 किलो किरकोळ भावात 1470 रुपयांना मिळत होते. बंदीची घोषणा होताच हा भाव 1525 रुपयांवर जाऊन पोहचला. भारत दरवर्षी 70 हजार कोटी रुपयांचे पामतेल आयात करतो.

भारत हा पामतेलाचा मोठा आयातदार देश आहे. आपल्या एकूण खाद्यतेलाच्या 65 टक्के तेलाची इंडोनेशियाकडून आयात करण्यात येते. हा आकडा फार मोठा आहे. त्यामुळे इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर लादलेली बंदी भारतीय स्वयंपाकगृह, हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे यांच्यासाठी संकटाची चाहुल आहे. कारण त्यामुळे किचनचे बजेट कोलमडणार आहे. तेलाच्या किंमती पुन्हा भडकल्याने सर्वसामान्य भारतीयाला इंधनासोबतच खाद्यतेलाच्या किंमती रडवणार आहे. इंडोनेशियाच्या या भूमिकेमुळे मलेशियाचे फावले आहे. हा देश आता रिफाइंड तेलाच्या वाढवण्याची भीती आहे.

दरम्यान, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा विभागाच्या अहवालानुसार, खाद्यतेलाची घरगुती मागणी जवळपास 250 लाख टन इतकी मोठी आहे. तर उत्पादन अगदी नगण्य म्हणजे 112 लाख टनाच्या जवळपास आहे. 56 टक्क्यांची ही तूट भरून काढण्यासाठी भारताला इतर देशांवर अवलंबून रहावे लागत आहे. खाद्यतेल आयातीवर भारताचा दरवर्षी 70 हजार कोटी रुपयांचा खर्च होतो. हा आकडा डोळे विस्फरणारा आहे. आता इंडोनेशियाने घेतलेल्या बंदीच्या निर्णयाने सर्वसामान्य भारतीयांचे कंबरडे मोडणार आहे आणि सरकारसाठी ही धोक्याची घंटा आहे.

इंडोनेशिया या निर्णयामुळे केवळ भारतातील सर्वात मोठा खरेदीदारच नव्हे तर जागतिक स्तरावरील ग्राहकांनाही त्रास होईल, कारण पाम हे जगातील सर्वाधिक खपत असलेले तेल आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली होती, मात्र मार्चमध्ये ही बंदी उठवण्यात आली होती.