महागड्या खाद्यतेलाच्या किमतीपासून दिलासा मिळणार, लवकरच दर घसरणार
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ । सध्या वाढत्या महागाईमुळे देशातील सर्वसामान्य होरपळून निघत आहे. मागील गेल्या काही महिन्यात खाद्य तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. वाढत्या खाद्यतेलामुळे सर्वसामान्य किचन बजेट कोलमडले आहे. सध्या १७० ते १८० रुपये किलो खाद्य तेल विकले जात आहे. मात्र, अशातच महागड्या खाद्यतेलाच्या किमतीत दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. मे किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल आणि पामोलिन तेल या तेलांच्या किमती घसरण्यास सुरुवात होईल.
गेल्या दोन महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात सर्व खाद्यतेलाच्या किमती ४००- ६००डॉलर प्रति टन (३१-४६ रुपये प्रति किलो) वाढल्या आहेत. परंतु मागणी कमी झाल्यामुळे खाद्यतेलाच्या किमती गेल्या एका आठवड्यात ३-५ टक्क्यांनी घसरल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, हळूहळू ही घसरण वाढत जाईल, ज्याचा भारताला फायदा होईल.
इंडोनेशिया आणि मलेशिया हे भारताला पाम तेलाचे प्रमुख पुरवठादार आहेत. मात्र, गेल्या महिन्यातील २८ एप्रिलपासून इंडोनेशिया पाम तेल आणि त्याच्याशी संबंधित कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे भारताला मोठा फटका बसला आहे. मात्र, इंडोनेशियाला पामतेलाच्या निर्यातीवरील बंदी जास्त काळ चालू ठेवता येणार नाही. येत्या काही दिवसांत हे निर्बंध उठविले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय रशिया आणि अर्जेंटिना येथून सूर्यफूल तेलाची खेपही येण्यास सुरुवात होणार आहेत.
त्यामुळे लकवरच खाद्यतेलाच्या किंमती कमी होतील. दरम्यान, ५ मेपासून भावात किरकोळ घसरण सुरू झाली आहे. कारण १५ दिवसांपूर्वीपर्यंत देशात सोयाबीन तेलाचा घाऊक दर १५ किलोमागे २७०० रुपये होता, तो आता २५८० रुपये प्रतिकिलो लिटरपर्यंत खाली आला आहे.