गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले ! खाद्यतेलांच्या किमतींनी घेतली पुन्हा उसळी, पहा आताचे दर..

जानेवारी 31, 2026 12:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । उद्या १ फेब्रुवारी देशाचा आर्थिक अर्थसंकल्प सादर होणार असून यातून सर्वसामान्यांना महागाईतुन दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र त्यापूर्वी दैनंदिन वापरातील अत्यावश्यक असलेल्या खाद्यतेलांच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. यामुळे गृहिणींचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. अवघ्या एका महिन्यातच शेंगदाणा तेलाचे दर प्रतिकिलो १५० वरून २१५ रुपये किलोवर पोहोचले आहेत.

oil

साधारणपणे सण-उत्सवांच्या काळात खाद्यतेलाची मागणी वाढल्याने दर वाढतात. मात्र, यंदा दिवाळीत दर स्थिर होते. आता कोणताही मोठा सण नसताना तेलाचे दर भडकले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून स्थिर असलेल्या खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य गृहिणींचे किचन बजेट कोलमडले आहे. सध्याची परिस्थिती पाहता पुढील काही आठवड्यांत दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या काही दुकानांत जुन्या स्टॉकमुळे तेल जुन्या दरात उपलब्ध असले, तरी नवीन साठा येताच हे दर सर्वत्र लागू होतील. दरम्यान, यंदा पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका तेलबियांना बसला आहे. काही भागांत अपेक्षित पावसाचा अभाव तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे भुईमूग आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी बाजारात कच्च्या मालाची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम खाद्यतेलांच्या किमतींवर झाला आहे. विशेषतः शेंगदाण्याची आवक कमी झाल्याने शेंगदाणा तेलाच्या दरात मोठी वाढ नोंदवली जात आहे.

तेलाचे दर रुपयात (प्रतिकिलो)
डिसेंबर मध्ये १२५ रुपयावर असलेले सोयाबीन तेलाचे दर आता १५० रुपयावर पोहोचला. तर सूर्यफूल तेल डिसेंबरमध्ये १४० रुपये होते ते आता १७० रुपये प्रति किलो इतके आहे. तर शेंगदाणा १५० रुपये होते. ते आता २१५ रुपये प्रति किलोवर पोहोचले. सणासुदीचा हंगाम नसतानाही अशी दरवाढ झाल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now