जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२४ । एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु झाले असून अशातच सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी आहे. केंद्र सरकारने आयात शुल्कवाढीनंतर खाद्यतेलांच्या दरात प्रतिकिलोमागे २२ ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच २ ते ५ रुपयांनी महागलेले खाद्यतेल शनिवारी २२ ते २५ रुपयांनी महागले आहे. शेतकऱ्यांना तारण्यासाठी केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे आता ग्राहकांची काही दिवस ‘तेल’ कोंडी होणार आहे.
यंदा सोयाबीन, भुईमूग, तीळसह अन्य कडधान्यांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र यंदा लागवडीसह अन्य खर्चाचा अंदाज बघता बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादकांनी शेतमालाची साठवण करून ठेवली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत खाद्यतेलाला महागाईची उकळी फुटली आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करत निर्यात मूल्यही हटविल्याने कांद्याच्या भावात शनिवारी वाढ झाली.
त्याचबरोबर सोयाबीनची ९० दिवस हमीभावाने खरेदी करण्याच्या निर्णयापाठोपाठच केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क २० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याने खाद्यतेलांच्या दरात प्रतिकिलोमागे २२ ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. लवकरच सोयाबीनच्या भावातही वाढ होऊ शकते.
कसे आहेत दर (प्रतिकिलो)
तेल पूर्वीचे नवे दर
सोयाबीन – आधी १०५.. आता १२६
पामतेल – आधी १०४.. आता १२७
शेंगदाणा – आधी२०४.. आता २१०
सूर्यफूल – आधी १०२.. आता १२७