⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

ग.स.निवडणूक निकालाच्या वेळी दांगडो, रस्त्यावरच भिडले तिन्ही गट, शिवीगाळ आणि हाणामारी

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२२ । जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी असलेल्या ग.स.सोसायटीच्या अध्यक्षपदाची निवड आज गुरुवारी होत आहे. सहकार, लोकसहकार आणि प्रगती पॅनलमध्ये जोरदार चुरस असून संचालक फोडाफोडीचे प्रयत्न होणार हे निश्चित होते. गुरुवारी अध्यक्षपदाची निवड होण्यापूर्वीच तिन्ही गटाचे सदस्य रस्त्यावरच एकमेकांवर धावून गेले. शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी सर्वांना आवरत असताना देखील कुणी जुमानत नसल्याने पोलिसांनी काठ्या उगारला होत्या. संचालक पळवापळवीवरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सहकार गटाने गळाला लावलेल्या दोन्ही सदस्यांना चारचाकीतून उतरू देणार नसल्याची भूमिका लोकसहकार गटाने घेतली होती.

आशिया खंडातील सर्वात मोठी पतपेढी असलेल्या ग.स.सोसायटीची निवडणूक यंदा चुरशीची झाली असून सहकार, लोकसहकार आणि प्रगती शिक्षक पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मतदारांनी कोणत्याच गटाला बहुमत दिले नसून सहकार गटाला ९, लोकसहकार गटाला ६ तर प्रगती शिक्षक गटाच्या ६ संचालकांना संधी मिळाली आहे. अध्यक्ष निवडीसाठी ११ चा जादुई आकडा गाठावा लागणार असल्याने सहकार गटाने खेळी खेळात लोकसहकार गटाचे २ संचालक गळाला लावले होते. गुरुवारी दुपारी अध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाल्यावर संचालक मतदानासाठी पोहचत होते.

सहकार गटाचे सदस्य चारचाकीने मतदानस्थळी पोहचल्यावर लोकसहकार गटातून फोडलेल्या ज्ञानेश्वर सोनवणे आणि रवींद्र सोनवणे यांना चारचाकीतुन बाहेर पडू न देण्याची भूमिका लोकसहकार गटातर्फे घेण्यात आली. दोन्ही गटाच्या सदस्यांमध्ये यावेळी जोरदार शिवीगाळ आणि हाणामारी झाल्याने पोलिसांनी देखील दांडुका हाती घेतला होता. जवळपास अर्धा तास गोंधळ सुरु होता. सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पोलिसांनी तगडा फौजफाटा नेमत सहकार गटाच्या सर्व संचालकांना सुखरूपपणे सभागृहात पाठविले.

आमच्या लोकसहकार गटाचे ६ आणि प्रगती शिक्षक सेना गटाचे ६ सदस्य निवडून आले होते. बहुमतासाठी ११ सदस्यांचा आकडा आवश्यक होता आमच्याकडे १२ सदस्य होते. सहकार गटाने आमच्या गटातील दोन सदस्यांना आमिष देत रात्री पळवून नेले. आम्ही त्यांना आमच्या गटातून निवडून दिले परंतु ते पळून गेले त्यामुळे आम्ही त्यांना जाब विचारत होतो. दुसरा काहीही प्रकार नव्हता. आमच्यातर्फे रावसाहेब पाटील हे अध्यक्षपदाचे उमेदवार असून सभागृहात काहीही होऊ शकते, अशी माहिती लोकसहकार गटाचे प्रमुख मनोज पाटील यांनी बोलताना दिली.

पहा लाईव्ह आपबिती :