जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । देशात कोरोना आला आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव लॉकडाऊन लावण्यात आला. लॉकडाऊनमुळे अचानक उद्भवलेल्या अडचणींचा सामना करावा लागल्याने महिलांवर होणारे अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढले. वाढती व्यसनाधीनता, आर्थिक चणचण यासह समोर आलेले विवाहबाह्य संबंध, सोशल मीडियाचा अतिरेक देखील कौटुंबिक वादाला कारणीभूत असल्याचे एका पाहणीत समोर आले आहे.
कोरोनाने अनेकांचे आयुष्य पालटले. काहींना लॉटरी लागली तर बहुतांश जणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. संसाराची गाडी चालविताना लॉकडाऊनमुळे अनेकांची ततफफ उडाली. संकटांचा सामना करीत जगायचे कसे हे कोरोनाने शिकवले. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन लावला. सुरुवातीला काही दिवस चालेल असा वाटणारा हा लॉकडाऊन बंद-सुरु असा तब्बल दोन वर्ष चालला. लॉकडाऊनचा आनंद घेत घरातच अनेकांनी धमाल केली तरी अनेकांचे संसार देखील लॉकडाऊनमुळे मोडले.
जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊन काळात आणि लॉकडाऊननंतर समोर आलेल्या प्रकरणात कौटुंबिक हिंसाचार वाढल्याचे निर्दशनास आले आहे. कौटुंबिक वाद वाढले असले तरी त्यात महिलांवरच अत्याचार झाले. घरात होणारे कितीतरी वाद चार भिंतीच्या आड दाबले गेले तर जे समोर आले त्यांची कारणे धक्कादायक होती. लॉकडाऊनमुळे सर्वप्रथम समोर आली ती आर्थिक चणचण, आर्थिक चणचणने वाढवली व्यसनाधीनता. दोघांचा परिणाम मानसिकतेवर झाला आणि मग तो संताप पत्नीवर निघू लागला. कुटुंबात वडीलधाऱ्यांना आणि मुलांना बोलू शकत नसल्याने पत्नीवर हात उचलला जाऊ लागला.
चिडचिडेपणा वाढल्याने कुटुंबातील वादात जुनी उणीदुणी काढली गेली. माहेरून पैशांची मागणी होऊ लागली. लग्नात मानपान दिला नाही म्हणून छळ सुरु झाला. काही तर धक्कादायक कारणे समोर आली. एरव्ही पती-पत्नीची भेट दिवसभरात केवळ सायंकाळनंतर पती कामाहून घरी आल्यावरच होत होती. लॉकडाऊनमध्ये मात्र काही वेगळे झाले. दिवसभर पती-पत्नी एकमेकांच्या समोर राहू लागले. दिवसभर सोबत असल्याने विवाहबाह्य संबंध उघड झाले. कुठे पतीचे तर कुठे पत्नीचे विवाहबाह्य संबंध समोर आले. त्यावरून दोघांचे वाद झाले. त्यातही बहुतांशी महिलांनाच अत्याचार सहन करावा लागला.
दिवसभर मोबाईलचा वापर होत असल्याने संशयीवृत्ती वाढली. पती-पत्नी एकमेकांवर संशय घेऊ लागले. संशयातून पुन्हा वाद झाले. सोशल मीडियाचा अतिरेक, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पोस्ट केले जाणारे फोटो, व्हिडीओ, रिल्स मनात खटकू लागले. अमुक करू नको, तमुक करू नको म्हणून बंधने लादली गेली. सर्वच असह्य झाल्याने वाद विकोपाला जाऊन दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. कोरोनासोबत जगायचं आहे असे म्हटले जात असले तरी पुन्हा केव्हा लॉकडाऊन लागेल याची शाश्वती नाही. कुटुंबातील वाद टाळत संसाराची गाडी सुरळीत ठेवण्यासाठी काही मर्यादा पाळणे आवश्यक आहे.
कुटुंबातील प्रत्येक सदस्य जबाबदारी आणि समजूतदारपणे वागला तर कुटुंब व्यवस्था टिकून राहील. आयुष्यात येणाऱ्या काही अडचणीमुळे आपली मनस्थिती चांगली नसल्यास आपण एखाद्या समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. प्रत्येकवेळी पत्नीचीच चूक असेल असे नसते काही वेळेस स्वतःचे देखील परीक्षण करणे आवश्यक आहे. कुटुंबात नेहमी खेळीमेळीचे वातावरण राहावे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा, असा सल्ला समुपदेशकांनी दिला आहे.