जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२४ । यंदा वेळेपूर्वी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला होता. सुरुवातील राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र अशातच आता राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मान्सूनचा वेग मंदावला आहे. दुसरीकडे पावसाने उघडीप दिल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. जळगावातही उकाड्यात वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले.
दरम्यान, मान्सूनचा वेग मंदावला असला तरी सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, या सरींचा देखील जोर कमी झाला आहे. खान्देश आणि पूर्व विदर्भातील मान्सूनच्या पावसाची प्रतिक्षा आहे. मौसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी दोन तीन दिवस लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे, तर काही भागात पावसाने गेल्या काही दिवसांपासू दांडी मारली आहे. यामुळे जळगावसह काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. कमाल तापमान सरासरी तीन ते चार अंशांनी वाढून ३५ ते ४० अंश सेल्सिअसवर गेले आहे. काही ठिकाणी तापमानवाढीमुळे हवेतील बाष्पाचे ढगांत रूपांतर होत आहे. त्यामुळे मेघगर्जना, वादळी वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, येत्या ४८ तासांत राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात सध्या कमकुवत मान्सून पाहायला मिळत आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, 20 जूननंतर मान्सूनचे वारे अधिक बळकट होण्याची शक्यता असून यानंतर राज्यात मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ताज्या हवामान अपडेटनुसार, येत्या आठवड्यात किमान घाट भागात आणि धरणाच्या पाणलोटांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 19 ते 20 जूननंतर मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असून त्यानंतर 21 जूनपासून महाराष्ट्रात जोरदार मान्सून पाहायला मिळेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.