जुन्या भांडणातुन तरूणाच्या डोक्यावर लोखंडी सुरा मारून गंभीर दुखापत !
जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२३ । जळगाव शहरातील पोलीस कॉलनी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाच्या डोक्यावर लोखंडी सुरा मारून गंभीर दुखापत केली व दगडफेकरून शिवीगाळ केल्याचा प्रकार रविवारी ९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहीन खान यासीन खान (वय-२१) रा. सुप्रिम कॉलनी, पोलीस कॉलनी जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी ९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास मोहीन हा नमाज पठण करून घराकडे येत असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून पोलीस कॉलनीतील फिरदोस डेअरीजवळ इम्रान खाटीक, रेहान खाटीक, उजेफ खाटीक आणि अफसाना खाटीक सर्व रा. सुप्रिम कॉलनी, पोलीस कॉलनी, जळगाव यांनी शिवीगाळ केली. तर यातील एकाने कोंबडी कापण्याचा लोखंडी सुरा मोहीन खान याच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली.
तर इतरांनी शिवीगाळ करून मोहिनच्या अंगावर दगडफेक केली. यात मोहीन खान हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता मोहिन खान याने दिलेल्या फिर्यादीवरून इम्रान खाटीक, रेहान खाटीक, उजेफ खाटीक आणि अफसाना खाटीक यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.