जळगावात थंडीची चाहूल; तापमानात घट झाल्याने गारवा वाढला
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात नागरिकांना तीनही ऋतुंचा अनुभव घ्यायला मिळत आहे. महिन्याच्या सुरुवातीच्या दोन्ही आठवड्यात ऑक्टोबर हिट व उकाड्यामुळे जळगावकर हैराण झाले होते. तर सायंकाळच्या वेळेस जोरदार पाऊसही झाला. आता मात्र काही दिवसांपासून तापमानात घट होत आहे. तापामानात घट झाल्याने सकाळच्या हवेत गारवा जाणवत आहे. सकाळी गारठा वाढू लागल्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचा चटका मात्र तापदायक ठरत आहे.
जळगाव जिल्हयात आता थंडीची चाहूल लागली आहे. शनिवारी जळगावचे कमाल तापमान ३४.८ अंश तर किमान १८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. त्यामुळे आता जळगावकरांना काही प्रमाणात गारवा जाणवू लागला आहे.
जळगाव शहरात रात्रीच्या तापमानात ४ ते ५ अंशाची घट झाली आहे. दरम्यान, किमान तापमानात आणखी घट होऊन पारा १६ अंशापर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. यामुळे गारवा अजून वाढणार आहे. यासह पहाटेच्या वेळेस काही प्रमाणात धुक्याचेही प्रमाण वाढले आहे.