जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । राज्याला आणि जळगावकरांना राजकीय पळवापळवी काही नवीन नाही. वर्षभरापूर्वी जळगाव मनपात नगरसेवकांची पळवापळवी सुरु होती तर आज राज्यात आमदारांची पळवापळवी सुरु आहे. लग्न ठरले आणि मुलीला पळवून नेले, एखाद्याला फूस लावून पळविले, आमिष दाखवत पळविले असे आपण नेहमी ऐकले आहे. राज्यातील घडामोडींशी निगडित एक पोस्ट जळगावातील डॉ.विलास भोळे (Dr Vilas Bhole Jalgaon) यांनी शेअर केली असून पळवापळवी काय फक्त राजकारणात असते? असे म्हणत त्यांनी रुग्णांची देखील पळवापळवी होते असे म्हटले आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ४२ आमदार फुटले असून स्वतःचा वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी एक एक करीत शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदारांची पळवापळवी केली आहे. विधान परिषद निवडणूक आटोपल्यावर मुंबई ते सुरत व्हाया ठाणे आणि पुढे अहमदाबाद ते गुवाहाटी असा प्रवास आमदारांना करावा लागला आहे. आमदारांच्या पळवापळवीत शिवसेना सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यातच खा.संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते नाराज झाले आहे.
जळगावातील प्रसिद्ध डॉक्टर विलास भोळे यांनी, पळवापळवी काय फक्त राजकारणात असते? पेशंट व कर्मचारी पण पळविले जातात एका दवाखान्यातून दुसर्या दवाखान्यात!
सिव्हील हॉस्पिटल व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर घोडेबाजार असतो पेशंट खासगीत पळविण्याचा! अशा आशयाची फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. डॉ.भोळे यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रत्युत्तर दिले असून शासकीय रुग्णालयातील नेत्यांचे आरोग्यदूतच पळवापळवी करतात असा आरोप देखील केला आहे. डॉक्टर असून रुग्णांची सत्यता मांडल्याने डॉ.विलास भोळे यांचे कौतुक होत आहे.
डॉ.भोळे यांच्या पोस्टवर एकाने कमेंट केली असून बरोबर आहे सर हॉटेल, फार्मा, किराणा अशा अनेक उद्योग धंद्यामध्ये कुशल कर्मचाऱ्यांना पगारवाढ करून पळविले जाते असे त्यांनी म्हटले आहे. राज्याच्या घडामोडींमध्ये डॉ.विलास भोळे यांची पोस्ट लक्षवेधी ठरत आहे.