जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । जळगाव येथील ख्यातनाम डॉ सुनीलदत्त शिवराम चौधरी यांना, अहमदनगरच्या न्यूज लाईन मीडिया या मध्यमसमूहाकडून राज्यस्तरीय आरोग्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा पुरस्कार सोहळा रंगला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना न्यूज लाईन कडून प्रतिवर्षी सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा मान डॉ रामकृष्ण सुनीलदत्त चौधरी यांनी डॉ सुनीलदत्त चौधरी यांच्या वतीने स्वीकारला.
डॉ सुनीलदत्त चौधरी हे अबोली प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवतात आणि होमिओपॅथी सेवा ही ते देतात. डॉ चौधरी यांनी आपल्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजात एक आदर्श घालून दिला आहे. कोव्हीडच्या काळात त्यांनी उललेखनीय काम केले. दुर्गम भागातील महिलांचे दैनंदीन जीवन सुकर व्हावे यासाठी त्यांनी केलेले काम नावाजले गेले आहे.
*रुग्णसेवेत लौकिक असणाऱ्या डॉ चौधरी यांनी विविध क्षेत्रात स्वतःची नाममुद्रा उमटवली आहे. आपला मुलगा डॉ. रामकृष्ण याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कन्याकुमारी ते लेह या प्रवासाबद्दल त्यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉडस मध्ये झाली आहे. ३ हजार ८४७ किलोमीटरचे अंतर त्यांनी अवघ्या ६ दिवस ५ तास आणि २५ मिनिटांत पूर्ण केले. भारताच्या चारी कोपऱ्याना जोडणारा प्रवास त्यांनी एकहाती पूर्ण केला. १३ हजार ८३५ किलोमीटरचे अंतर त्यांनी अवघ्या पंचवीस दिवसांत पूर्ण करुन मुलगा डॉ. रामकृष्ण याचे आणखी एक स्वप्न साकार केले. आत्तापर्यंत त्यांनी चारचाकीतून पाच लाख किलोमीटर चा प्रवास केला आहे.*
गेली ३५ वर्षे रुग्णसेवा करताना समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांना शैक्षणिक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ.चौधरी यांनी पुढाकार घेतला. आदिवासी बांधवांसाठी वैद्यकीय शिबिरे आयोजित केली. मोफत औषध वाटप केले. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना ते नेहमीच शैक्षणिक मदत करीत असतात. दुर्गम भागातील महिलांच्या आरोग्य विषयक सुरक्षेसाठी सॅनिटरी पॅडच्या वापरासंदर्भात त्यांनी मोठ्या प्रमाणात जागृती केली. अबोली प्रतिष्ठान च्या माध्यमातून त्यांनी चिकनगुनिया/ बर्डफ्ल्यू काळात महत्वपूर्ण सेवा दिली एसटी कर्मचारी, वाहतूक पोलीस, सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना मास्क वाटप केले आहे.
यापूर्वी माननीय राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते “सावली सन्मान ” देऊन डॉ सुनीलदत्त चौधरी यांचा सन्मान करण्यात आला आहे.