⁠ 
मंगळवार, जून 25, 2024

रावेर लोकसभेसाठी डॉ.केतकी पाटील वडिलांचा ‘हात’ सोडून भाजपाच्या वाटेवर?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ४ एप्रिल २०२३ | लोकसभा निवडणूक २०२४ अवघ्या वर्षभरावर येवून ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदार संघ हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचे गड मानले जातात. मात्र यंदा राजकीय गणितं बदलल्याने निवडणुकीची चुरस आतापासूनच जाणवायला लागली आहे. विशेषत: रावेर लोकसभा मतदारसंघात जोरदार राजकीय पडघम: वाजू लागले आहेत. भाजपाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्यासह अन्य इच्छुकांनी मतदारांशी गाठीभेटी वाढविल्या आहेत. यंदा रावेर मतदार संघातून डॉ.केतकी पाटील (Dr Ketaki Patil) देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र त्या वडिलांचा ‘हात’ सोडून त्या भाजपाच्या वाटेवर तर निघाल्या नाही ना? अशी चर्चा का सुरु झाली आहे, हे आज आपण जाणून घेवूया…

डॉ.केतकी पाटील यांनी लग्नसमारंभांच्या माध्यमातून मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. आधी राजकारणात फारशा सक्रिय नसणार्‍या डॉ.केतकी पाटील गत ५-६ महिन्यांपासून कमालीच्या सक्रिय झाल्या आहेत. गावागावांमध्ये संपर्कांवर त्यांनी भर दिला आहे. यासाठी स्वतंत्र्य यंत्रणा कार्यरत झाली आहे. त्यांच्या या गाठीभेटींमुळे त्या रावेर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. असे असले तरी त्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्या काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर जाणे टाळत आहेत. त्या काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे बोलले जाते. मोठी बाब म्हणजे, त्यांनी भाजपातर्फे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

डॉ.उल्हास पाटील (Dr Ulhas Patil Congress) हे काँग्रेसचे नेते असले तरी त्यांचे भाजप व आरएसएस परिवारातील अनेकांशी कौटुंबिक संबंध आहेत. या दृष्टीने त्यांनी मुलीसाठी प्रयत्न केले तर त्यात नवल वाटायला नको! कदाचित यामुळेच ते भाजपावर टीका करणे टाळतात. डॉ.केतकी पाटील देखील आतापासून ठराविक पक्ष किंवा विचारसरणीत अडकण्यापेक्षा ‘प्रॅक्टिकल’ राजकारणाच्या वाटेवर जातील, अशी शक्यता जास्त आहे. या मतदारसंघातील लेवा समाजाचे प्राबल्य, उच्च शिक्षित व महिला उमेदवार हे त्यांच्या जमेच्या बाजू असल्याने खासदार रक्षा खडसे यांच्या विरुध्द तुल्यबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात काँग्रेसची ताकद किती? याची जाणीव डॉ.उल्हास पाटील यांना आहे. अपक्ष उमेदवारीचे निकाल काय लागतात, याचा अनुभव त्यांनी आधीही घेतला आहे. यामुळे मुलीच्या राजकीय लाँचिंगसाठी ते वेगळ्या वाटेची चाचपणी करत नाहीए ना? अशी शक्यता नाकारता येणार नाही.

…म्हणून डॉ.केतकी पाटील यांना पुढे केले

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची पुन्हा खासदार होण्याची राजकीय महत्वकांक्षा संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे. सन १९९८ मध्ये काँग्रेसपक्षाने त्यांना लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यावेळी विक्रमी मतांना ते विजयी देखील झाले. मात्र त्यांना खासदारकीचा पाच वर्षांचा पूर्ण कालावधी मिळाला नाही. अवघे १३ महिन्यात सरकार कोसळल्याने लोकसभा बरखास्त झाली. सन १९९९ मध्ये पराभूत झाल्यानंतर २००४ मध्येही त्यांना काँग्रेसतर्फे पुन्हा उमेदवारी मिळाली. मात्र ते पराभूत झाले. सन २००७ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. सन २००९ मध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. तर २०१४ मध्येही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिली. यावेळी त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. मात्र त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये काँग्रेसने ही जागा पुन्हा मिळवून डॉ.उल्हास पाटील पुन्हा अधिकृतपणे रिंगणात उतरले. मात्र त्यांचा पराभव झाला. यामुळे आता २०२४ मध्ये स्वत: निवडणूक लढण्याऐवजी त्यांनी कन्या डॉ.केतकी पाटील यांना पुढे केले आहे.

लेवा समाजाची मोठी ताकद

भाजपची अनेक वर्षापासून मतदारसंघात पकड घट्ट आहे. गेल्या दोन्ही निवडणुकीत मोदी लाटेमुळे रक्षा खडसे विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या. या मतदारसंघात मराठा समाजाचे मताधिक्य साडेतीन लाखांच्या वर आहे. मात्र, या ठिकाणी दोन लाखात मताधिक्य असलेल्या लेवा समाजाचाच खासदार निवडून येत असतो. रावेर मतदारसंघात लेवा पाटीदार समाजाचे सुमारे २ लाख ५ हजार मतदार आहेत. आतापर्यंतचा इतिहास पाहता या मतदारसंघातून लेवा पाटीदार समाजाला संधी मिळाली आहे. रक्षा खडसे यांनी खासदार म्हणून आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शिवाय मतदारसंघात त्यांचा संपर्क दांडगा असून, मतदारसंघात बांधणीही त्यांनी चांगली केली आहे. असे असले तरी भाजपातर्फे अजून दोन-तीन जण इच्छुक आहेत.

समाजनिहाय मतांचे गणित

एका सर्व्हेनुसार, रावेर मतदारसंघात मराठा समाज ३ लाख ७० हजार तर दोन लाख ५ हजारांवर लेवा समाजाचे मतदार आहेत. मुस्लिम २ लाख, बौद्ध २ लाख १० हजार, गुर्जर ७८ हजार, माळी ८५ हजार, कोळी १ लाख १२ हजार, पावरा आणि पारधी २१ हजार, धनगर ४३ हजार, बंजारा ७० हजार, तडवी ४४ हजार, राजपूत ४२ हजार, तेली ३८ हजार, राजस्थानी ८० हजार अशी समाजनिहाय मते आहेत.

अशी आहे मतदारसंघाची सद्य:स्थिती

रावेर लोकसभा मतदारसंघात रावेर, चोपडा, यावल, भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड, नांदुरा, मलकापूर या तालुक्यांतील चोपडा ते मलकापूरपर्यंत ८३५ गावांचा समावेश असून ४१ जिल्हा परिषद गट व ८२ पंचायत समितीचे गण आहे. रावेर तालुक्यातील ११६ गावे, यावल ८९ गावे, भुसावळ ५१ गावे, चोपडा ११९ गावे, मुक्ताईनगर ८४ गावे, बोदवड ५३ गावे, जामनेरची १६० गावे, मलकापूर ६४ गावे, नांदुरा ९९ अशा ८३५ गावांचा समावेश आहे. यात ५३ आदिवासी गावांचा समावेश आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात रावेर, चोपडा, यावल, फैजपूर, सावदा, मुक्ताईनगर, वरणगाव, जामनेर, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा अशा १२ नगरपालिका आहे.