⁠ 
सोमवार, मे 6, 2024

डॉ.केतकी पाटलांची रावेर लोकसभा मतदारसंघात ‘स्वबळावर’ चाचपणी

जळगाव लाईव्ह न्यूज | ९ ऑगस्ट २०२३ | घरात मोठा राजकीय वारसा असतांना स्वत:ला स्वबळावर सिध्द करण्याची धमक खूपच कमी जणांमध्ये असते. असेच एक तरुण व्यक्तीमत्व म्हणजे, डॉ.केतकी पाटील. वडील डॉ. उल्हास पाटील हे काँग्रेसचे माजी खासदार, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असल्याने त्यांना काँग्रेस पक्षातून मोठ्या पदावर सहज संधी मिळणे शक्य आहे. मात्र स्वबळावर राजकीय कर्तृत्व निर्माण करण्याच्या वाटेवर डॉ. केतकी पाटील यांनी वाटचाल सुरु केली आहे.

काँग्रेसचे माजी खासदार, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील व जिल्हा बँकेच्या माजी संचालक डॉ. वर्षा पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांचा आज वाढदिवस (९ ऑगस्ट) आहे. आई वडील यांच्या पाऊलावर पाऊल टाकून केतकी पाटील यांनी वैद्यकिय पदवी घेतल्यानंतर डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटलमध्ये त्या वैद्यकीय सेवेचे कार्य करत आहेत. यासह वडिलांप्रमाणे त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. मात्र घरात मोठा राजकीय वारसा असतांना वडीलांची मदत न घेता राजकीय आखाड्यात त्या स्वबळावर स्वत:ला सिध्द करण्यासाठी धडपडत आहेत.

डॉ.केतकी पाटील रावेर लोकसभा मतदार संघातील इच्छूक उमेदवारांपैकी एक मानल्या जातात. लोकसभा २०२४च्या दृष्टीने त्यांनी मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. आधी राजकारणात फारशा सक्रिय नसणार्‍या डॉ.केतकी पाटील गत काही महिन्यांपासून कमालीच्या सक्रिय झाल्या आहेत. गावागावांमध्ये संपर्कांवर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या या गाठीभेटींमुळे त्या रावेर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. असे असले तरी त्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कारण त्यांनी आतापर्यंत काँग्रेससह कोणत्याही पक्षाचे लेबल लावून घेतलेले नाही.

सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता लोकसभा निवडणुकीपर्यंत कोणती व कशी राजकीय समीकरणे राहतात, याचा अंदाज लावणे थोडेसे कठीण आहे. डॉ.केतकी पाटील देखील आतापासून ठराविक पक्ष किंवा विचारसरणीत अडकण्यापेक्षा ‘प्रॅक्टिकल’ राजकारणाच्या वाटेवर जातील, अशी शक्यता जास्त आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील लेवा समाजाचे प्राबल्य, उच्च शिक्षित व महिला उमेदवार हे त्यांच्या जमेच्या बाजू असल्याने त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

यामुळे डॉ.केतकी पाटील यांनीही कोणत्याही पक्षाचे लेबल न लावून घेता स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यावर भर दिला आहे. येणाऱ्या निवडणुकीत डॉ. केतकी पाटील वडिलांप्रमाणेच काँग्रेस पक्षाचा वारसा चालवतील की, आपली वेगळी वाट शोधतील, याचे उत्तर आगामी काळात मिळेलच. मात्र स्वकर्तृत्वावर स्वत:ची स्वतंत्र वाट निवडणाऱ्या डॉ.केतकी पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

लेवा समाजाची मोठी ताकद
रावेर मतदारसंघात मराठा समाजाचे मताधिक्य साडेतीन लाखांच्या वर आहे. मात्र, या ठिकाणी दोन लाखात मताधिक्य असलेल्या लेवा समाजाचाच खासदार निवडून येत असतो. रावेर मतदारसंघात लेवा पाटीदार समाजाचे सुमारे २ लाख ५ हजार मतदार आहेत. आतापर्यंतचा इतिहास पाहता या मतदारसंघातून लेवा पाटीदार समाजाला संधी मिळाली आहे. एका सर्व्हेनुसार, रावेर मतदारसंघात मराठा समाज ३ लाख ७० हजार तर दोन लाख ५ हजारांवर लेवा समाजाचे मतदार आहेत. मुस्लिम २ लाख, बौद्ध २ लाख १० हजार, गुर्जर ७८ हजार, माळी ८५ हजार, कोळी १ लाख १२ हजार, पावरा आणि पारधी २१ हजार, धनगर ४३ हजार, बंजारा ७० हजार, तडवी ४४ हजार, राजपूत ४२ हजार, तेली ३८ हजार, राजस्थानी ८० हजार अशी समाजनिहाय मते आहेत.