⁠ 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जळगाव जिल्ह्याशी होते विशेष नाते; २९ वेळा केला होता जळगाव दौरा… वाचा सविस्तर

जळगाव लाईव्ह न्यूज | 13 एप्रिल 2023 | आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची १४ एप्रिलला जयंती… ज्या महामानवाने समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र दिला. असामान्य कर्तृत्व गाजवणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जळगाव जिल्ह्याशी (Jalgaon District) तब्बल २९ वेळा संबंध आला. ओबीसी या शब्दाचा प्रयोगही सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातच झाला आहे. बाबासाहेबांचा जळगाव जिल्ह्याशी आलेल्या संबंधांचा थोडक्यात घेतलेला आढावा…..

बाबासाहेबांच्या जळगाव भेटीबाबत आठवणींना उजाळा देतांना आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ म्हणाले की, सर्वप्रथम बाबासाहेब जुलै १९२६ मध्ये जळगावी आले. त्यावेळी त्यांनी आसोदा येथे मुक्काम केला होता. या दौर्‍यात बाबासाहेब आताच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये ते काही वेळ थांबले. तिथे त्यांनी चटणी व कळण्याची भाकर असे जेवण घेतले. जेवण आटोपल्यावर ते आसोदा येथे संत चोखामेळा वसतीगृहाच्या भेटीकरिता गेले. यावेळी त्यांनी वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रत्येकाला त्यांनी तु शिक्षण घेवून काय करणार? असा प्रश्‍न विचारला. यावेळी डी.जी.जाधव (मुळ रा. वाघळी ता. चाळीसगाव) नावाच्या एका तरुणाने मी समाजसेवा करणार… असे उत्तर दिले. त्या तरुणाच्या उत्तराने बाबासाहेब खूपच प्रभावित झाले. पुढे डी.जी.जाधव बाबासाहेबांसोबत जुळले. सप्टेंबर १९३२ मध्ये जेंव्हा गांधी-आंबेडकर यांच्या जो पुणे करार झाला त्यावर जाधवांची स्वाक्षरी आहे. १९३७ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी डी.जी.जाधव यांना स्वतंत्र मजूर पक्षातर्फे उमेदवारी दिली होती. बाबासाहेबांनी जाधव यांच्या प्रचारार्थ जळगाव, जामनेर, शेंदुर्णी, सावदा येथे सभा घेतल्या. जामनेर येथे त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या निवडणुकीत जाधव हे विजयी झाले होते, असेही जयसिंग वाघ यांनी नमूद केले.

ओबीसी शब्दाचा सर्वप्रथम जळगावमध्ये उल्लेख

दुसर्‍या एका घटनेचा संदर्भ देत जयसिंग वाघ म्हणाले की, शाळेमध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांना मिळणारी वागणूक, अस्पृश्य व आदिवासी समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अवस्था या विषयीचे सर्वेक्षण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर २२ ऑक्टोबर १९२९ रोजी भालोद (ता.यावल) येथे स्टार्ट कमिटीचे सभासद म्हणून आले होते. या समितीमध्ये एकूण ९ सभासद होते, मात्र या विषयाच्या अभ्यासाची सर्व जबाबदारी बाबासाहेब यांच्यावर सोपविण्यात आली होती. यावेळी बाबासाहेब न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गेले होते मात्र त्या दिवशी शाळेला सुट्टी असल्याने त्यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला नाही. यावेळी मुख्यध्यापक व एका शिक्षकाला बोलवून त्यांनी माहिती घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीवर बाबासाहेबांनी नाराजी व्यक्त केली होती. तसा शेरा देखील त्यांनी लिहिला मात्र त्याचवेळी शाळेची इमारत व परिसराचे कौतूक केले. या स्टार्ट कमिटीमध्येच बाबासाहेब यांनी ओ.बी.सी.या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख केला व १९३० पासून ओबीसी समाज असा शब्द प्रयोग सुरु झाला, असेही त्यांनी नमूद केले.

आंबेडकर चळवळीचे अभ्यासक तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ.मिलिंद बागूल बाबासाहेबांच्या भेटीबाबत एक संदर्भ सांगतांना म्हणाले की, बाबासाहेब १९४० मध्ये एका न्यायालयीन खटल्याच्या कामानिमित्ताने अमळनेरला आले होते. ते रेल्वे स्थानकावर उतरल्यावर तेथून न्यायालयाचे अंतर २ किमी होते. त्यावेळी रेल्वे स्टेशन बाहेर उभ्या असलेल्या टांगेवाल्याने बाबासाहेबांना केवळ जातीमुळे टांग्यात बसविण्यास नकार दिला. याप्रकरणी त्या टांग्यावाल्यावर जातीवाचक गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावेळी त्याला न्यायालयाने पाच रुपयांचा दंड ठोठावला होता.

अजिंठा येथील बाबासाहेबांचा फोटो
अजिंठा येथील बाबासाहेबांचा फोटो

दुसर्‍या एका घटनेचा संदर्भ देत डॉ. बागूल म्हणाले की, मे १९४६ मध्ये बाबासाहेब रेल्वेने दिल्लीहून मुंबईला जात होते. या प्रवासादरम्यान भुसावळ रेल्वेस्थानकावर बाबासाहेबांचे दर्शन घेता यावे, त्यांचे स्वागत करता यावे यासाठी टी.टी.तायडे यांनी तत्कालीन डीआरएमची भेट घेवून बाबासाहेबांची गाडी विशेष फलाटावर नियोजित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे थांबविण्याची विनंती केली. जी डीआरएम यांनी तात्काळ मान्य करत तशी व्यवस्था करुन दिली. त्यावेळी श्री.तायडे यांनी बाबासाहेबांचा सत्कार केला त्यानंतर बाबासाहेबांनी उपस्थितांशी संवाद साधला होता, असेही डॉ.बागूल यांनी सांगितले.

मराठी साहित्याचे अभ्यासक तथा दैनिक देशदूतचे मुख्य उपसंपादक डॉ.गोपी सोरडे यांनी बाबासाहेबांच्या भेटीचा संदर्भ देतांना सांगितले की, बाबासाहेबांनी जी चळवळ सुरु केली होती ती जळगाव जिल्ह्यापासूनच सुरु केली होती. १९२९ मध्ये बाबासाहेब जेंव्हा आसोदा गावी आले होते. तेंव्हा त्यांची चळवळीचे बीजे रोवली. त्यातून दौलत दामू पाटील, मोतीराम पाटील, दगाजी शामराव पाटील असे अनेक चळवळीचे कार्यकर्ते तयार झाले. त्यावेळी बाबासाहेबांनी जळगवा व पाथर्डी येथे सभा घेतली होती. त्यात त्यांनी धर्मांतराविषयीच्या जनमताची चाचणी घेतल्याचेही डॉ.सोरडे यांनी सांगितले.

चाळीसगाव येथे २००१ रुपयांची थैली चोरीला

डॉ.बाबासाहेब यांनी जळगाव येथे मे १९२८मध्ये ‘महार वतन’ विषयी परिषद भरविली होती. ही परिषद व.वा.वाचनालयाच्या प्रांगणात झाली होती. या सभेला अध्यक्ष म्हणून राजमल लखीचंद जैन हेसुद्धा हजर होते. बाबासाहेंबाची जळगावकरांसाठीची सर्वात मोठी आठवण म्हणजे, खान्देश मिलची डॉ.बाबासाहेब यांनी केली वकिली केली होती. १९३३ मध्ये खान्देश लक्ष्मी विलास मिल विरुद्ध ‘गड्यूएट कोल कंसर्न’ या खटल्या करीता डॉ.बाबासाहेब जळगाव न्यायालयात आले होते. खान्देश मिलचे ते वकील होते. त्यांच्या सोबत डब्लू.डी.प्रधान व जी.एस.गुप्ते हे दोन वकीलदेखील होते. बाबासाहेबांच्या प्रभावी युक्तीवादामुळे या खटल्याचा निकाल खान्देश मिलच्या बाजूने लागला. बाबासाहेबांची अजून एक मोठी आठवण म्हणजे, सन १९३५ मध्ये धनजी रामचंद्र बिजहाडे हे आसोदा गावाचे संरपंच म्हणून निवडून आले. दलित समाजातील ते पहिले सरपंच होते. ही बाब डॉ. बाबासाहेब यांना कळल्यानंतर ते असोद्यात आले व मुक्कामी राहिले होते. डॉ.बाबासाहेब यांनी १९५१ मध्ये मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीहून मुंबईला जात असताना भुसावळचाळीसगाव येथे एकाच दिवशी जाहीर सभांमधून लोकांना राजीनाम्यामागील भूमिका सांगितली. भुसावळच्या सभेस प्रचंड गर्दी होती. तेथील सभा आटोपून ते चाळीसगावला गेले. तेथे दादासाहेब गायकवाड यांच्याहस्ते बाबासाहेब यांना २००१ रुपयांची थैली देण्यात आली. मात्र सभेत ही थैली चोरीला गेली होती.

बाबाासाहेबांचा (Dr. Babasaheb Ambedkar) अस्थिकलश आजही चाळीसगावात

चाळीसगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पुतळ्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना खोदकामावेळी पुतळ्याखाली सुमारे दहा फूट खाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिकलश मिळून आला. समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागूल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ६ डिसेंबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा मुंबईत ९ डिसेंबरला चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. १० डिसेंबरला त्यांच्या अस्थिविसर्जनासाठी भय्यासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या हजारो लोकांनी मुंडण केले. ज्यात चाळीसगावचे कट्टर आंबेडकरी नेते श्यामाजी जाधव, दिवाण चव्हाण यांच्यासह डॉ. आंबेडकरांना मानणार्‍या कट्टर कार्यकर्त्यांचा समावेश होता. या सर्वांनी भय्यासाहेबांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी चाळीसगावला आणल्या. १९५८ मध्ये जेव्हा हा पुतळा उभारण्यात आला, तेव्हा त्यांनी हा अस्थिकलश पुतळ्याखाली ठेवला होता.

जाणून घ्या नाविन्यपूर्ण माहिती :