जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पथक बुधवारी रात्री गस्तीवर असताना गेंदालाल मील फिरत होते. शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील संशयीत जुबेर उर्फ डबल भिकन शेख हा घरी असल्याने त्याला पकडण्यासाठी पथक पोहचले. पथकाची चाहूल लागताच डबलने घराच्या छतावर पळ काढला. स्वतःवरचे लोखंडी रॉडने हल्ला करीत जखमी केले आणि पोलिसांना मी स्वतःचा जीव देईल अशी धमकी दिली. इतकंच नव्हे तर पथकावर गॅस सिलेंडर फेकत गोंधळ घातला. डबलच्या आईने एका पोलीस कर्मचाऱ्याला पकडत पाठीला चावा घेतला. शहर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनानुसार हवालदार विजय निकुंभ, पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे, योगेश पाटील, प्रणेश ठाकूर, तेजस मराठे, योगेश इंधाटे, रतन गिते, राजकुमार चव्हाण, महिला पोलीस हवालदार अलका वानखेडे, कमलेश पाटील, बापू मोरे, खान, होमगार्ड सचिन कापडे, मोबीन शेख हे बुधवारी रात्री गस्तीवर होते. शिवाजीनगर, गेंदालाल मील परिसरात गस्त घालत असताना एका गुन्ह्यातील संशयीत जुबेर उर्फ डबल भिकन शेख वय-२५ याच्या घरी पथक पोहचले.
डबलच्या घराबाहेर येताच कुत्रे भुंकत असल्याने त्याला पोलिसांची चाहूल लागली. त्यामुळे तो जिन्याने घराच्या गच्चीवर गेला व तिथून शेजारी अफसरबेग नूरबेग उर्फ कालू यांच्या घरात घुसला. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून डबलने गेम खेळला व एका लोखंडी अँगलने स्वतःला डोक्यात आणि कपाळावर दुखापत करू लागला. पोलिसांना घाबरविण्यासाठी त्याने ‘तुम्ही माझ्याजवळ आले तर मी स्वतःला मारून टाकेल’ अशी धमकी दिली. पोलिसांनी व नागरिकांनी त्याला समजावले तरीही त्याने ऐकले नाही. पोलीस जिन्याने घराच्या खाली उतरत बाहेर खाली त्याची वाट पाहत थांबले. पोलीस थांबून असल्याने डबलने घरातील गॅस सिलेंडरचे रेग्युलेटर काढून सिलेंडर पोलिसांच्या अंगावर फेकले. वेळीच पोलीस बाजूला सरकल्याने सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
सिलेंडर फेकताच जुबेरने वरून खाली उडी मारली. तो एका माणसाच्या अंगावर पडल्याने त्या माणसाने त्याला बाजूला लोटले. पोलिसांनी लागलीच जुबेरला पकडत ताब्यात घेताच त्याची आई मुमताजबी व भाऊ फारुख यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मुमताजने पोलीस कर्मचारी प्रफुल्ल धांडे यांच्या पाठीला चावा घेत त्यांना जखमी केले. पोलिसांशी केलेल्या झटापटीत दोन कर्मचाऱ्यांच्या हाताची बोटे ओरबडली गेली. रात्री १.१० ते २ पर्यंत हा गोंधळ सुरू होता. पोलिसांनी डबल उर्फ जुबेर शेख याला अटक केली असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर करीत आहे. जुबेर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.