⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

दूध संघ निवडणूक : बी ग्रेड तूपावरुन सी ग्रेडचे राजकारण

जळगाव लाईव्ह न्यूज | ९ डिसेंबर २०२२ | जळगाव जिल्हा दूध संघाच्या २० पैकी १९ जागांसाठसी शनिवार दि.१० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व राष्ट्रावादीचे आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह जिल्ह्यातील आजी माजी मंत्री व आमदारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. आमदार मंगेश चव्हाण व आमदार एकनाथराव खडसे यांच्यातील आरोप प्रत्यारोपांमुळे जिल्हा दूध संघ निवडणुकीचे वातावरण तापले आहे. दूध संघाच्या निवडणुकीत यंदा प्रथमच राजकीय चिखलफेक राजकीय पातळीवरुन वैयक्तीक पातळीवर घसरल्याचे पहायला मिळाले. बी ग्रेड तुपाच्या कथित अपहाराच्या मुद्यांच्या अवतीभोवती निवडणूक फिरत असली तरी यंदा जिल्ह्यात सी ग्रेडचे राजकारण पहायला मिळाल्याची सर्वसामान्यांची भावना आहे.

संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे की, दूध संघाची निवडणूक ही खडसे व महाजन यांच्यातील राजकीय संघर्षांमुळेच तापली आहे. मात्र महाजन यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना पुढे केले आहे. चव्हाण यांनी आक्रमक पावित्रा घेत खडसेंवर हल्ले सुरुच ठेवले आहेत. खडसे- महाजन यांच्यातील वाद देखील वैयक्तीक पातळीवर घसरलेला दिसून येतो. जामनेर येथील एका कार्यक्रमात आ. एकनाथराव खडसे यांनी गिरीश महाजनांवर घराणेशाहीवरून टीका केली होती. ते म्हणाले की, गिरीश महाजनांना मुलगा असता तर तोही राजकारणात असता. या विधानाचा मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार करतांना खडसेंचा मुलगा निखिल खडसे याने आत्महत्या केली का त्याचा खून झाला, हे तपासण्याची गरज असल्याचे विधान करत खळबळ उडवून दिली होती.

खडसे म्हणतात मंगेश चव्हाणांनीच भ्रष्टाचार केला

दूध संघातील बी ग्रेड तूप व बटर चोरीचा प्रकार मुख्य प्रशासक असलेल्या आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासक मंडळाच्या कार्यकाळातच झाला असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. जिल्हा दूध संघात २९ जुलै २०२२ ते ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रशासक मंडळ होते. त्यावेळी संचालक मंडळ कार्यरत नव्हते, कार्यकारी संचालक मनोज लिमये, सी. एम. पाटील हे देखील पदावर कार्यरत नव्हते. या काळात प्रशासक मंडळाने निविदा न काढता अखाद्य तूप व बटर अकोला येथील एका चॉकलेट कंपनीला विक्री केले असल्याचा आरोप खडसेंनी केला आहे.

मंगेश चव्हाण म्हणतात, खडसे जेलमध्ये जाणारच

आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे, की एकनाथ खडसे यांचा हा जावईशोध आहे, वास्तविक हा गैरव्यवहार त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे अध्यक्ष असतांनाच घडला आहे, या प्रकरणी गुन्हा दाखल होवून कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना अटक झाली होती. त्यांनी सुध्दा पोलिसांच्या जबाबात गुन्हा कसा घडला याची माहिती दिली आहे. आपण जिल्हा दूध संघात ३२ दिवस मुख्यप्रशासक होतो, मात्र या काळात आपण एकही पैशाचा भ्रष्टाचार केला नाही. जिल्हा दूध संघातील गैरव्यवहार एकनाथराव खडसे यांच्या घरापर्यंत आला आहे, त्यामुळे त्यांचा शेवटचा थयथयाट सुरू आहे. यांना जेलमध्ये जाण्यापासून शिवाय कोणताही पर्याय नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असा दावा आमदार मंगेश चव्हाण यानी केला आहे.

बी ग्रेड तुपाचे राजकारण

जिल्हा दूध संघाने अन्न व सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत केंद्रीय अन्न परवाना घेतला असून त्याद्वारे केवळ खाद्य पदार्थांचे उत्पादन करण्यास परवानगी असते. मात्र असे असतांना देखील दूध संघाने स्पॉईल्ड फॅट म्हणजेच बी ग्रेड तुपाचे उत्पादन करुन ते तूप विठ्ठल रुख्मिणी एजन्सीच्या माध्यमातून विक्री केले आहे. तसेच होलसेल दराने कमी दरात तुपाची विक्री केलेली एजन्सीला देखील या तुपाची विक्री करण्यास देखील परवानगी नव्हती. त्याचप्रमाणे विठ्ठल रुख्मिणी या एजन्सीकडे रिटेल विक्रीचा परवाना असून त्या एजन्सीला कमी किंमतीत मोठ्या प्रमाणात होलसेल दरात अखाद्य तुपाची विक्री केली आहे. बी ग्रेड हे अखाद्य तुप एका नावाजलेल्या चॉकलेटमध्ये वापरण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.