घरगुती नळ जोडणीची कामे कालमर्यादेत पूर्ण करावी – गुलाबराव पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ । जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना व घरगुती नळ जोडणीची कामे कालमर्यादेत पूर्ण करावी असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.राज्यातील जलजीवन मिशन अंमलबजावणीचा आढावा मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
जलजीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक पुनर्जोडणीची कामे मार्च २०२२ अखेरपर्यंत तसेच नवीन योजनांची कार्यवाही ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कालबध्द कार्यक्रम आखावा व यावर्षीचे निर्धारित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे.सर्व मुख्य अभियंत्यांनी जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही यंत्रणांच्या नियमित बैठका घेवून कामांची प्रगती राखावी असे निर्देशही मंत्री पाटील यांनी दिले.
जलजीवन मिशन अंतर्गत घरगुती नळ जोडणी प्रगती, जलजीवन मिशन प्रगतीपथावरील योजना, जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या रखडलेल्या योजना, १० वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या योजना,५ ते १० वर्ष कालावधीच्या योजना, ३ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या योजनांची प्रगती,जलजीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक पुनर्जोडणी कामांचा आढावा, नवीन योजनांची कामे या बाबींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर,जलजीवन मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद, पाणीपुरवठा विभागाचे सहसचिव प्रवीण पुरी ,राज्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत कार्यरत सर्व मुख्य अभियंते,अधीक्षक अभियंते यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे मंत्रालयातील अन्य अधिकारी उपस्थित होते.