⁠ 
सोमवार, मे 6, 2024

कुत्र्यांचा डुकरावर हल्ला, दुचाकीस्वार जोशी महाराजांच्या मेंदूला दुखापत

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२१ । एरंडोल शहराबाहेरील धरणगांव रस्ता आणि म्हसावद रस्त्यावरील बेवारस कुत्रे आणि डुकरे उदंड झाली असून दररोज एक-दोन डुकरांचा कुत्रे फडशा पाडत असून लहान मुले आणि महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सरस्वती कॉलनी आणि इतरांनी देखील नपा मुख्याधिकारींकडे लेखी तक्रार केली होती. परंतू कुत्र्यांचा आणि डुकरांचा बंदोबस्त अद्याप झाला नसल्याने नागरीकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

याबाबत असे की, धरणगांव रस्त्यालगत साईगजानन कॉलनीतील रहिवासी विजय जोशी (महाराज) हे आपल्या स्कूटी वाहनाने मंगल टाईल्सकडून दि. २१ रोजी धरणगांव रस्त्याने जात असतांना अचानक लक्ष्मीनगरकडून दुपारी डुकराच्या मागे धावत २/३ कुत्रे आले आणि गाडीवर आदळले.

त्यामुळे विजय जोशी जोरात रोडवर फेकले गेल्याने डोक्यावर पडले, मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने बेशुध्द झाले. परीसरातील नागरीक आणि रिक्षाचालकांनी त्वरीत खाजगी दवाखान्यात हलविले परंतू गंभीर दुखापतीमुळे त्वरीत जळगांवी खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. जळगांव येथील न्युक्लीअस हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल आहेत. जोशी महाराज घरगुती जेवणाचे डबे पुरवून आपला उदरनिर्वाह चालवितात.

त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांना दवाखाना खर्च जास्त अपेक्षित आहे. २/३ ऑपरेशन्स करावी लागणार असून एरंडोल शहरासह परिसरातून, जिल्ह्यातून दानशूरांनी मदतीचा हातभार लावल्यास जोशी महाराजांवरील जेवघेणे संकट टळू शकणार आहे. यासाठी अल्केश जोशी मो. ७०५८५८५३०९ यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. एरंडोल नपाने आतातरी दखल घेवून बेवारस कुत्र्यांचा आणि डुकरांचा बंदोबस्त करावा अशी नागरीकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.