जळगाव शहरराजकारण

महामार्गासाठी एकत्र येणाऱ्या जळगावच्या लोकप्रतिनिधींना शहरातील खड्डेमय रस्ते दिसत नाही का?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । जळगाव शहरातला लागून असलेल्या आठ किलोमीटरच्या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खाली-वर झाला असून त्यामुळे नागरिकांचा जीव जाऊ शकतो. महामार्गाच्या समस्येबाबत खड्ड्यांविरोधात मनपातील सर्वच पदाधिकारी एकत्र आलेले दिसले. यासाठीची विशेष बैठक सतराव्या माळ्यावर देखील घेण्यात आली. मात्र, जळगाव शहरात असलेल्या रस्त्यांच्या खड्ड्यांचे काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर सीमा भोळे, माजी महापौर भारती सोनवणे, सरिता कोल्हे, नगरसेविका गायत्री राणे, नगरसेविका उज्वला बेंडाळे या सर्वांनी एकत्रित येत डायमंड व्हाट्सअँप ग्रुपचे सदस्य म्हणून जळगाव शहराजवळ असलेल्या महामार्गाची पाहणी केली. याचबरोबर खड्डे चक्क टेपने मोजले. यानंतर खासदार उन्मेष पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आठ दिवसाच्या आत सर्व त्रुटी दुरुस्ती करा, अन्यथा तुमच्या तोंडाला डांबर फासतो असा इशारा दिला.

संबंधित त्रुटी ‘नही’च्या अधिकाऱ्यांना माहिती व्हाव्यात यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या सतराव्या माळ्यावर महापौरांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महामार्गाच्या कामातील त्रुटींवर त्यात उहापोह देखील करण्यात आला. मात्र, जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असताना या खड्ड्यांची मोजणी कोण करणार? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

जळगाव शहरात प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सध्या शहरात सर्व आलबेल कारभार सुरू असल्यासारखे शहरातील पदाधिकारी व अधिकारी वागताना दिसत आहेत. एकाही पदाधिकाऱ्याने आजपर्यंत हातात पट्टी घेऊन शहरातले रस्त्यांचे खड्डे मोजले नाहीत. अशावेळी स्वतःच्या अंतर्गत येणाऱ्या विषयाकडे दुर्लक्ष करत इतरांकडे बोट दाखवण्याचे काम हे पदाधिकारी करत असल्याची जनभावना पाहायला मिळत आहे. महामार्ग महत्वाचा असला तरी त्यापेक्षा शहराच्या गल्लीबोळातील रस्ते जास्त महत्वाचे आहेत.

जळगाव लाईव्ह न्यूजने गेल्या महिन्यात जिल्हा न्यायालयापासून गणेश कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील १०० मीटर अंतरातील खड्डे मोजले असता ते शेकडो होते. मुख्य रस्त्याची हि अवस्था आहे तर इतर रस्त्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होतो. जळगाव शहरातल्या प्रत्येक रस्त्यावर खड्डे आहेत. नागरिकांचे रोज यामुळे हाल होत आहेत. ज्याप्रकारे महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव जाऊ शकतो त्याच प्रकारे जळगाव शहरातल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव जाऊ शकत नाही का? आणि जर गेलाच तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Articles

Back to top button