लम्पी स्किन डिसिज साथरोगाबाबतचा अहवाल त्वरीत सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यातील काही गावातील जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease ) या साथरोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होवू नये, याकरीता पशुसंवर्धन विभागाने जनावरांची तपासणी करुन याबाबतचा अहवाल त्वरीत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिलेत.
जिल्ह्यातील मौजे वाकडी, ता. चाळीसगाव, नांद्रा, ता. पाचोरा, पिंपरखेड, वरखेड, पिर्चेडे, ता. भडगाव याठिकाणी जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease) या साथरोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला आहे. ही बाब लक्षात घेऊन प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार संसर्ग क्षेत्रापासून 10 किमी परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याचबरोबर या भागातील जनावरांचे लसीकरण करण्यासाठी सद्यस्थितीत 15 हजार लस सेवाशुल्कातून खरेदी करण्यात आली असून चाळीसगांव, पाचोरा व भडगाव तालुक्यात लसीकरण सुरू करण्यात आल्याचेही श्री. राऊत यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर भागातील जनावरांमध्ये या साथरोगाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता अजून 10 हजार लस पशुसंवर्धन विभागाकडून सोमवारी प्राप्त होणार असून जिल्ह्यातील पशुधनांची संख्या लक्षात घेता विभागाकडे अतिरिक्त 50 हजार लसीची मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यात लम्पी स्कीन सदृष्यने बाधीत जनावरांची संख्या, त्यांना लागणारी लसीची मात्रा याबाबत तातडीने तपासणी करुन याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल सोमवारपर्यत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिले असून यावरुन जिल्ह्यात आवश्यकतेनुसार लसीची मात्रा उपलब्ध करुन देता येईल. तसेच सेवाशुल्कातून जिल्हास्तरावर लस खरेदी करण्यात येईल. असेही श्री. राऊत यांनी म्हटले आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीकडून 10 हजार रुपयांचा ग्रामनिधी उपलब्ध करुन देणार-डॉ पंकज आशिया
जिल्ह्यातील जनावरांमध्ये आढळून आलेल्या लम्पी स्किन डिसिज या साथरोग आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनावरांना तातडीने लसीची मात्रा देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीकडून 10 हजार रुपये ग्रामनिधीतून उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी यंत्रणेला दिले आहेत.
यानुसार सर्व तालुक्यात गट विकास अधिकाऱ्यांच्या स्तरावर ग्रामसेवक व पशुसंवर्धन संस्थाप्रमुखांची बैठक घेवून हा निधी तात्काळ उपलब्ध करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. यातून लस खरेदी व औषध खरेदी करण्यात येइल. ग्रामपातळीवर लसीकरण व गोठा स्वच्छता, गोचीड निर्मूलन मोहिम स्वरुपात राबविण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही डॉ आशिया यांनी कळविले आहे.
पशुधन मालकांनी आपल्या जनावरांवर बारकाईन लक्ष ठेवावे जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज सदृष्य लक्षणे आढळून आल्यास पशुसंवर्धन विभागाकडून त्वरीत तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.