जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२४ । शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यानंतर जळगाव जिल्हा बँकेने एक मोठा निर्णय घेतला. ज्या शेतकऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात अर्थात १ एप्रिल २०२३ पासून तीन लाख रुपये पीक कर्ज घेतले आहे, त्या शेतकऱ्यांना व्याज माफ करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. असा निर्णय घेणारी जळगाव जिल्हा बँक राज्यात पहिली असल्याचा दावा चेअरमन संजय पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
१ लाख ९० हजार शेतकऱ्यांना १२ कोटी रुपयांचे कर्ज गेल्या वर्षी वाटप करण्यात आले आहे. त्यावरील व्याजाची रक्कम ७२ कोटी रुपये इतकी आहे. ज्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकांनी मागील वर्षी ३ लाखापर्यंत वर्षी पीक कर्ज वाटप केले होते, त्यांच्याकडून व्याज वसूल करू नये, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. मात्र, नंतरच्या काळात पुन्हा एक आदेश काढून व्याजासह कर्ज वसूल करण्याचे सांगितले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असल्याने यासंदर्भात आपण मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन यात तोडगा काढण्याची विनंती केली, त्यानंतर राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वतंत्र जळगाव जिल्हा बँकेशी संबंधित सचिव अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
त्यानंतरही मार्ग निघाला नाही. सरकारकडून अपयश आले. शेतकऱ्यांचे हित पाहता जळगाव जिल्हा बँकेने त्यांच्या पातळीवर व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला. हा लाभ ज्यांनी मागील वर्षी तीन लाखाचे कर्ज घेतले व ३१ मार्चपर्यंत कर्ज भरणाऱ्यांनाच मिळणार आहे. कबाकीदारांसाठी हा निर्णय लागू होणार नसल्याचे संजय पवार यांनी स्पष्ट केले. जे शेतकरी नियमित कर्ज भरतील त्यांना चालू वर्षात वाढीव कर्ज दिले जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.