जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२१ । पीएमजीकेवाय योजनेच्या मोफत धान्यात अनियमितता प्रकरणी त्या १२३ रेशन दुकानांचे या योजनेचे मोफत धान्य वितरण बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.नोव्हेंबर महिन्यात मोफत धान्य योजनेचे धान्य गोदामात असतानांच हे धान्य परस्पर वितरण केल्याचे या रेशनदुकानदारांनी दाखवले आहे. त्यामुळे या रेशनदुकानदारांची चौकशी पूर्ण होत नाही. तोपर्यंत त्यांचे धान्यवितरण बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
जळगाव तालुक्यात ११२ दुकानदारांनी नोव्हेंबर महिन्याचे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे धान्य घेतलेले नाही. तसेच ९३ दुकानदारांनी हे धान्य घेतले आहे. मात्र ज्यांनी धान्य घेतले नाही आणि न घेताच परस्पर वाटप केल्याचे दाखवले आहे.अशा १२३ दुकानदारांना तहसीलदारांनी नोटीस बजावली होती.त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी याबाबत तक्रार केली होती. मागच्या आठवड्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यातील ४७ दुकानदारांची सुनावणी घेतली.
त्यावेळी दुकानदारांनी त्यांचे म्हणणे मांडले होते. मात्र, त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या दुकानदारांना धान्य वितरीत न करण्याचे आदेश गोदाम व्यवस्थापकांना दिले आहेत. या धान्य दुकानांना फक्त पीएमजीकेवायचे धान्य मिळणार नाही. त्यांना मोफत धान्य दर महिन्याप्रमाणे वितरीत केले जाणार आहे.