⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | महामार्ग ‘अपग्रेडेशन’साठी थेट दिल्ली दरबारी पाठपुरावा सुरु; जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद

महामार्ग ‘अपग्रेडेशन’साठी थेट दिल्ली दरबारी पाठपुरावा सुरु; जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। २५ ऑगस्ट २०२३। शहरातील रस्त्यांचा विकास होत असला तरीही अपघातांचे सत्र संपेना झाले आहे. महामार्गाचे चौपदरीकरण झाले असले, तरी ते सदोष असल्याने अपघात होतच असतात. परवाच आकाशवाणी चौकात बोदवड तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी सचिवांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याने पुन्हा महामार्ग अपग्रेडेशनचा मुद्दा चर्चेला आला आहे.

आकाशवाणी चौकातील उड्डाणपुलासह पूर्ण महामार्ग ‘अपग्रेडेशन’साठी थेट दिल्ली दरबारी पाठपुरावा सुरु असल्याची माहिती जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण करताना सुटलेल्या दोन टप्प्यांतील कामांसह, आकाशवाणी चौक-शिव कॉलनी रेल्वे उड्डाणपूल व गिरणा नदीवरील बांभोरीच्या पुलाचाही समावेश आहे.

सोबतच जळगाव विमानतळावर नाईट लँण्डींगची सुवीधा, भुसावळ जंक्शनला रेल्वे टर्मिनल्ससाठी प्रयत्न आणि वंदेभारत एक्सप्रेसचा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर कार्य करत असल्याचे जिल्‍हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.

अपग्रेडेशनमध्ये पाळधी ते खोटेनगर व कालिंकामाता चौक ते तरसोद फाट्यापर्यंतचे चौपदरीकरण, शिव कॉलनीजवळील रेल्वे उड्डाणपुलाचे विस्तारीकरण, आकाशवाणी चौक, अजिंठा चौकात उड्डाणपूल अशी कामे प्रस्तावित आहेत. जोपर्यंत या टप्प्यात ही सर्व कामे पूर्ण होत नाहीत, तोवर शहरातील चौपदरी महामार्गाची उपयुक्तता शून्य ठरते.

त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी, खासदारांनी त्यासाठी पुाठपुरावा करणे गरजेचे आहे. महामार्गाचे सदोष काम, चौकांमधील तांत्रिक त्रुटी असलेले सर्कल यामुळे वाढलेले अपघात आणि वाहतुकीची कोंडी या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने वारंवार वृत्त प्रकाशित करुन पाठपुरावा केला आहे.

राष्ट्रीय महामार्ग शहराबाहेरुन गेल्यानंतर शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या अपग्रेडेशनसह आवश्यक ठिकाणी उड्डाणपुल आणि विस्तारीकरणाच्या कामाला गती मिळाली असून, दिल्ली दरबारी यासाठी पाठपुरावा सुरु आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाशी चर्चा सुरु असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या एकंदरीत विकासाच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या बाबींमध्ये विमानतळावर नाईट लँण्डींगची सुविधा, वंदेभारत एक्सप्रेस, भुसावळ जंक्शनला कन्टेनर टर्मिनल्स यासाठी केंद्र शासनाकडे निकडीने पाठपुरावा करण्यात येत असून, आगामी काळात जळगाव शहरासाठी ही मोठी कामे युद्धपातळीवर सुरु करण्याचा जिल्‍हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सोबतच एमआयडीसी परिसरात कामगार रुग्णालयासाठी (ईएसआयसी) जागा निश्‍चित करण्यात येऊन विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्‍हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह