एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळेना, वाळू माफियांकडे मात्र हजारो लिटरचा साठा

मे 28, 2026 12:17 PM

अमळनेर तालुक्यातील तापी नदी पात्रात जळगाव प्रशासनाच्या कारवाईत १ हजार ४७० लिटर डिझेल जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर शेती मशागतीची कामे (नांगरणी, रोटर) वेळेत करणे अशक्य झाले असताना मात्र दुसरीकडे वाळू उपसा करणाऱ्यांकडे चक्क 10 ते 12 बॅरेल डिझेल आढळून आल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावाजवळ तापी नदी पात्राच्या परिसरात महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने वाळू माफियांवर केलेल्या कारवाईत बेकायदेशीरपणे साठवून ठेवण्यात आलेल्या डिझेलचा साठा जप्त करण्यात आला. या धडक कारवाईत पथकाने सुमारे १ हजार ४७० लिटर डिझेल जप्त केले असून, त्याची एकूण किंमत १ लाख ५५ हजार रुपये आहे.

diesel 1

गोपनीय माहितीच्या आधारे २७ मे रोजी दुपारी महसूल आणि पोलिसांचे संयुक्त पथक तापी नदीकाठावरील वाळू डेपो परिसरात दाखल झाले. उपविभागीय दंडाधिकारी मयूर शिंगळे, तहसीलदार सुराणा, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मंडळ अधिकारी कल्याणी पाटील आणि ग्राम महसूल अधिकारी पवन शिंगारे यांच्या उपस्थितीत ही धडक कारवाई करण्यात आली.

पथकाने तापी नदीकाठावरील वाळू डेपो परिसराची कसून तपासणी केली. यावेळी झाडीझुडपात आणि डेपोच्या आडोशाला प्लास्टिकच्या ड्रममध्ये डिझेल लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. पंचांच्या उपस्थितीत तातडीने या जागेचा पंचनामा करण्यात आला. वेगवेगळ्या ड्रममधून एकूण १,४७० लिटर डिझेल जप्त करण्यात आले. कारवाईदरम्यान घटनास्थळी काम करणाऱ्या कामगारांची कसून चौकशी करण्यात आली. हा बेकायदेशीर डिझेल साठा अमळनेर येथील गिरीश तुलशीदास बेलदार यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा साठा पूर्णपणे बेकायदेशीर असल्याने महसूल विभागाने तो जप्त करून पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलीस स्टेशन येथे जमा केला आहे.

एकीकडे अमळनेर तालुक्यामध्ये कडक नियमांचे कारण पुढे करत सामान्य शेतकऱ्यांना शेतीकामासाठी साध्या कॅनमध्ये डिझेल दिले जात नाहीये. नियमांवर बोट ठेवून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असताना, दुसरीकडे मात्र याच वाळू वाहतूकदारांना राजरोसपणे आणि मोठ्या प्रमाणात डिझेल थेट नदीपात्रात ‘बॅरल’च्या बॅरल उपलब्ध आहे. यावरून इंधनाचा आणि काळ्या बाजाराचा मोठा साखळी गट तालुक्यात सक्रिय असल्याचे उघड झाले. दरम्यान या कारवाईनात फक्त डिझेलच नव्हे तर प्रशासनाकडून 10 पोकलेन मशीन, 10 डंपर आणि 6 बोटी जप्त करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर डिझेल साठवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी गिरीश बेलदार विरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कलम ३ व ७, तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८७ व २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now