जळगावात इंधनाचा तुटवडा नाही, तर साठेबाजी! डिझेल विक्रीत ८५ टक्क्यांची प्रचंड वाढ

मे 26, 2026 3:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात निर्माण झालेली इंधनाची टंचाई ही वास्तविक नसून ती अफवा आणि मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या साठेबाजीमुळे निर्माण झाल्याचे आता उघड झाले आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत डिझेल आणि पेट्रोलच्या विक्रीत अभूतपूर्व वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्ह्यातील साठेबाजांवर आता पोलीस आणि पुरवठा विभाग संयुक्तपणे कडक कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

dieselupdate

जळगावात डिझेल विक्री ८५%, तर पेट्रोल ५३% अधिक

२३ मे रोजी संपलेल्या कालावधीच्या आकडेवारीनुसार, जळगाव जिल्ह्यात नियमित साठ्यापेक्षा तब्बल ८५ टक्के अतिरिक्त डिझेल विकले गेले आहे. तर दुसरीकडे, पेट्रोलच्या मागणीतही मोठी वाढ झाली असून, जळगावात सरासरीपेक्षा ४० ते ५३ टक्क्यांपर्यंत अधिक पेट्रोलची विक्री झाली आहे. इंधनाच्या या कृत्रिम टंचाईमुळे जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दोन दिवसांपर्यंत कायम होते.

जळगाव जिल्ह्यात साठेबाजी होत आहे की काही माफिया यामध्ये सक्रिय आहेत, याचा शोध स्थानिक प्रशासनाकडून घेतला जाणार आहे. ग्राहकांच्या हक्काच्या इंधनावर डल्ला मारणाऱ्या साठेबाजांविरुद्ध जिल्ह्यातील पुरवठा अधिकारी आणि पोलीस यंत्रणा संयुक्त मोहीम राबवून गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊन अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

डिझेल विक्रीत अव्वल जिल्हे

राज्यात सर्वाधिक डिझेल विक्री अकोला जिल्ह्यात (१५४%) झाली. त्याखालोखाल नांदेड (११४%) आणि वाशिम (१०४%) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. जळगाव आणि कोल्हापूर जिल्हा ८५% अतिरिक्त डिझेल विक्रीसह या यादीत किंचित मागे असले, तरी हा आकडाही नेहमीच्या गरजेपेक्षा दुप्पट आहे. तसेच धाराशिवमध्ये ८७% वाढ नोंदवली गेली.

पेट्रोल विक्रीत जळगाव आघाडीवर

पेट्रोलच्या अतिरिक्त विक्रीचा विचार केला तर वर्धा, वाशिम, जालना, बुलढाणा, भंडारा आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये सरासरी ४० ते ५३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. म्हणजेच पेट्रोलच्या अति-वापरात किंवा साठवणुकीत जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now